Thursday, April 24 2025 1:34 pm

चांगली रुग्ण सेवा देणे आणि शक्य असलेला प्रत्येक कोविड मृत्यू टाळणे हे आपले प्रथम कर्तव्य

*आयुक्त अभिजीत बांगर यांनी साधला वैद्यकिय आरोग्य अधिकाऱ्यांशी संवाद* *ठाणे (०६) -* कोरोनाविरोधी लढ्यात आपण थोडेही गाफील राहून चालणार नाही. नागरिक, खाजगी डॉक्टर या सगळ्यांना त्यांचे गांभीर्य पटवून देण्यात महापालिकेच्या आरोग्य केंद्रांची आणि तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. चांगली रुग्ण सेवा देणे आणि शक्य असलेला प्रत्येक कोविड मृत्यू टाळणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यात अजिबात हयगय होऊ नये, अशी सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली आहे.
कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवरआयुक्त श्री. बांगर यांनी महापालिकेच्या सर्व वैद्यकिय आरोग्य अधिकाऱ्यांची बुधवारी बैठक घेतली. त्यात, सध्याची परिस्थिती हाताळण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच, रुग्ण संख्या वाढली तरत्याचे नियोजन कसे करावे याबद्दल दिशादर्शन करण्यात आले. स्थानिक पातळीवरील अडचणी,कर्मचारी उपलब्धता आदींबाबत काही अडचणीही यावेळी आयुक्त श्री. बांगर यांनी समजून घेतल्या.
या बैठकीस, सर्व वैद्यकिय आरोग्य अधिकाऱ्यांसह, उपायुक्त मनीष जोशी, उप वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता हमरजकर, डॉ. प्रसाद पाटील, डॉ. दीपा भंजन आणि डॉ. मनीष उबाळे उपस्थित होते.
नागरी आरोग्य केंद्र तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी करण्याचे आदेश आयुक्त श्री. बांगर यांनी या बैठकीत दिले. चाचणीचे प्रमाण वाढल्याने आपल्याला कोरोनाच्या प्रसाराचा अंदाज येईल. त्यानुसार, आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवता येईल, असेही आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले. सध्याच्या आकडेवारीनुसार, आनंदनगर, कळवा, गांधीनगरया भागात रुग्ण संख्या अधिक दिसते आहे. अशा भागात जास्त सतर्क राहावे लागेल,असे आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले. 
आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या नियोजनाचे सर्वाधिकार हे वैद्यकिय आरोग्य अधिकाऱ्यांकडे आहेत. कोविडसाठी जादा कर्मचारी घेऊन त्यांना बसवून ठेवू नये. त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण काम करून घ्यावे. आवश्यकतेनुसार आपण ऑनलाइन मीटिंगच्या माध्यमातून संपर्कात राहू. कोरोनाच्या काळात कोणत्याही प्रकारची हलगर्जी होणार नाही, याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी. हलगर्जी निदर्शनास आली तर नोटीस, खुलासा याची वाट न पाहता कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त श्री. बांगर यांनी दिला. 
चाचणी करण्याऱ्या टीमची जबाबदारी निश्चित केलेलीअसावी. चाचणी कोणी केली, नोंद कोणी केली,त्याचा फॉलोअप काय घेतला याची सगळी माहिती संबंधितांनी वेळोवेळी घ्यावी. त्याचबरोबर, नागरिक, रुग्ण आणि खाजगी डॉक्टर या सगळ्यांशी बोलताना आपण सौजन्याने वागावे. तसेच, कोरोनाबाधित रुग्ण हे रुग्णवाहिकेतून रुग्णालयात जातील, याची दक्षता घेतली जावी, असेही आयुक्त श्री. बांगर यांनी सांगितले. 
खाजगी डॉक्टरच्या ओपीडी मधील रुग्णांची स्थिती त्यांच्याशी चर्चा करून जाणून घ्यावी. व्हॉट्सॲप ग्रुपवर डॉक्टरांकडून माहिती आली की त्याची उलट तपासणी न करता थेट रुग्णांशी संपर्क साधला जावा, असेही आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले. 
कोविडला गृहीत धरून चालणार नाही. तसेच, लोकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. संशयाचे नव्हे तर विश्वासाचे वातावरण तयार करून स्थितीचे गांभीर्य पटवून देवू आणि कोरोनाचा सामना करूया, अशी अपेक्षा आपल्याला वैद्यकिय आरोग्य अधिकाऱ्यांकडून असल्याचे आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.