Tuesday, July 23 2019 2:09 am

घोषवाक्य आणि चित्रांच्या माध्यमातून ५ हजार विद्यार्थ्यांनी दिला रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त संदेश

ठाणे : अपघाताचे प्रमाण कमी व्हावे व वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावे हा संदेश घेऊन जनजागृती करण्यासाठी आज ५ हजार शालेय विद्यार्थ्यांनी घोषवाक्य स्लोगन व चित्रकला स्पर्धेतून संदेश देण्याचा प्रयत्न केला. ठाणे वाहतूक पोलीस, रेमंड लिमिटेड , आणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे येथील श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूल येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, रेमंड चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया, डब्ल्यूआयएए चे कार्यकारी संचालक नितीन डोसा आदी उपस्थित होते.

दरवर्षी महाराष्ट्रात वाहनांची संख्या वाढत असून रस्ते अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अपघातांचे प्रमाण कमी व्हावे तसेच रस्ते वाहतुकीचे नियम याबाबत जनजागृती व्हावी यासाठी  ठाणे येथील श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया हायस्कूल येथे विद्यार्थ्यांचे चित्रकला आणि स्लोगन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत तब्बल ५ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी रस्ते सुरक्षा बाबत विविध चित्र रेखाटली तसेच घोषवाक्य (स्लोगन) तयार केली. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करून त्यांना जनजागृती करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी बातचीत केली. तसेच गौतम सिंघानिया यांच्याहस्ते या विद्यार्थ्यांना पारितोषिके वाटप करण्यात आली. यावेळी बोलताना फणसाळकर म्हणाले की, “या विद्यार्थ्यांची प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. हे विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे.“ विद्यार्थ्यांनसाठी असे उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करीत रेमंड ने केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. गौतम हरी सिंघानिया यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “लहानपणापासून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे देणे गरजेचे आहे. जेणेकरून हे विद्यार्थी पुढे याबाबत जागृत राहतील.”