ठाणे, 14 आमदार प्रताप सरनाईक यांनी आज केलेल्या आयुक्तांसोबत बैठकीमध्ये घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडी दूर होण्याकरिता चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने दोन्ही बाजूला असलेल्या ९-९ मीटरच्या सर्व्हिस रोडचा समावेश मुख्य रस्त्यामध्ये समाविष्ट करण्याचे ठरले.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कापूरबावडीपासून गायमुखपर्यंत मेट्रोचे काम सुरू असून या कामामुळे या भागात नागरिकांना प्रचंड वाहतुककोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये बर्याचदा खाजगी वाहनासह फायर ब्रिगेडच्या गाड्या व ऍम्ब्युलन्सही अडकल्या जात असतात. आगीसारखी एखादी दुर्घटना घडल्यास अथवा रूग्णवाहिकेमध्ये अत्यंस्थ रूग्ण असल्यास सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. घोडबंदर रोडहून इच्छित स्थळी जाण्यासाठी कुठलाही पर्यायी मार्ग नसल्याने या रोडवरील वाहतुककोंडीमुळे कमीत-कमी अंतरासाठी अर्धा ते एक तासाचा कालावधी लागत आहे.
या भागातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार श्री. प्रताप सरनाईक यांना या गोष्टीची दखल घेण्यास सांगितली असता त्यांनी काही कार्यकर्त्यांसह कापूरबावडीपासून गायमुखपर्यंत सर्वेक्षण केले असता असे निर्दशनास आले की, घोडबंदर रोडवर १ बीएचके मध्ये राहणाऱ्या नागरिकांकडे सुद्धा चारचाकी वाहने असून मोठ्या प्रमाणात पार्किंगची समस्या असल्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या ९ मीटर सर्व्हिस रोडचा वापर रस्त्याजवळील दुकानदार व काही खाजगी गाड्या तसेच टेम्पो, ट्रक, ऑटो रिक्क्षा पार्किंगसाठी केला जातो, त्यामुळे तेथे पार्किंग प्लाझा उभारणे गरजेचे आहे. तसेच सर्व्हिस रोडवर असलेल्या पार्किंगमुळे वाहनचालक सर्व्हिस रोडचा वापर न करता मुख्य रस्त्याचाच वापर करीत असून सर्व्हिस रोडच्या बाजूला असलेल्या गटारावरील ५ ते ६ फुट असलेल्या फुटपाथचा वापर पादचार्यांना होत नसल्याचे निर्दशनास येत आहे.
जर दोन्हीं बाजूच्या ९-९ मीटरचा सर्व्हिस रोड हा घोडबंदरच्या मुख्य रस्त्याला जोडल्यास व मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन-दोन मीटरचा फुटपाथ केला तर पादचार्यांना व वाहनचालकांना या फुटपाथ व रस्त्याचा वापर करता येईल. सदरहू अतिरिक्त १४ मीटर सर्व्हिस रोड घोडबंदर रोडला जोडल्यास तेथील वाहतूक कोंडी सुटेल. तसेच स्थानिक नागरिक रस्त्यावर पार्किंग करीत असल्यामुळे त्यांच्यासाठी कापूरबावडीपासून गायमुखपर्यंत ६ ते ७ पार्किंग प्लाझाची निर्मिती करावी, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांना सुचविले.
त्याबाबत मा. आयुक्त श्री. अभिजित बांगर यांनी सिटी इंजिनियर यांना एस्टीमेट काढायला सांगितले असता सिटी इंजिनियर यांनी ५० ते ६० कोटी खर्च येईल असे सांगितले. त्यावेळी आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी विनंती केली कि, आपण हा पर्यायी मार्ग करीत असताना एकदाच पूर्ण १४ मीटरचा हा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून करावा जेणेकरून नागरिकांचा खड्डे मुक्त प्रवास होईल.
आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी केलेल्या सूचना मान्य करून मा. आयुक्त श्री. अभिजित बांगर यांनी आजपासूनच संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्याबद्दल आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व मा. आयुक्त श्री. अभिजित बांगर यांचे मनापासून आभार मानले.