Friday, February 14 2025 6:57 pm

घोडबंदररोडवरील वाघबीळ परिसरातील प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत – खासदार नरेश म्हस्के

वाघबीळ परिसरातील रहिवाशांनी घेतली खासदारांची भेट

ठाणे, 16 – ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील घोडबंदररोडवरील वाघबीळ परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या मूलभूत सोईसुविधांबाबत खासदार नरेश म्हस्के यांना निवेदन सादर केले होते. या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी आज (14 जानेवारी) संबंधित नागरिक व महापालिका अधिकारी यांची एकत्रित भेट महापालिकेच्या कै. अरविंदे पेंडसे सभागृहात घेतली. यावेळी पाणीपुरवठा, फेरीवाले समस्या, मलनिस्सारण वाहिन्या, मैदानाची उपलब्धतता, खुल्या असलेल्या विद्युतवाहिन्या, अर्धवट स्थितीत असलेले रस्ते आदी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश खासदार म्हस्के यांनी महापालिका प्रशासनास दिले.

यावेळी माजी महापौर मिनाक्षी शिंदे, माजी स्थायी सभापती राम रेपाळे, शिवसेना विभागप्रमुख मुकेश ठोंबरे तर प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त जी.जी गोदेपुरे, मनिष जोशी, दिनेश तायडे, मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, सहाय्यक आयुक्त बेला सुर्वे, उपनगरअभियंता विकास ढोले, कार्यकारी अभियंता संजय कदम, उपअभियंता अतुल कुलकर्णी व वाघबीळ परिसरातील 47 गृहसंकुलातील प्रतिनिधी राजेश अरांगळे, मर्सी, नेरस, विजय पांचाळ, रोशन मखिजा, विजय देसाई, तृप्ती आनंद, संतोष सिंग, निखिल ठोंबरे, प्रवीण नाखवा आदी उपस्थित होते.

वाघबीळ येथे 47 गृहसंकुले असून महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी रस्ते, मलनिस्सारण केंद्र आदीसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असून बहुतांश कामे अर्धवट स्थितीत आहेत, त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सदरची कामे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असल्याने खासदार नरेश म्हस्के यांनी आज झालेल्या बैठकीत अर्धवट रस्त्याची कामे पूर्ण करणे, मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

तसेच वाघबीळ परिसरात मागील काही दिवसांत रस्त्यांच्या दुतर्फा फेरीवाले मोठ्या प्रमाणावर उभे राहत असल्याने वाहतूक कोंडी होते तर काही ठिकाणी फूटपाथवर देखील फेरीवाल्यांचे अतिक्रमण होत असून नागरिकांना ये-जा करणे त्रासाचे होत असल्याच्या तक्रारी यावेळी नागरिकांनी केल्या. या संदर्भात्‍ प्रशासनाने संबंधित फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करुन देवून संपूर्ण रस्ते वाहतूकीसाठी खुले राहतील व फूटपाथही नागरिकांसाठी कायमस्वरुपी मोकळे ठेवावेत, तसेच दुरावस्था असलेल्या फूटपाथवर आवश्यक कामे करण्याच्या सूचनाही खासदार श्री. म्हस्के यांनी दिल्या.

या विभागातील गृहसंकुलांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही, मात्र खाजगी टँकर्सना पाणी कसे उपलब्ध होते असाही प्रश्न नागरिकांनी बैठकीत मांडला. यावर तातडीने कारवाई करुन टँकर्स पूर्णपणे बंद होतील या दृष्टीने कारवाई करावी व गृहसंकुलांना मुबलक पाणी नियमित मिळेल या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागास दिल्या.

वाघबीळ, हिरानंदानी आदी ठिकाणी नागरिकांसाठी महापालिकेची मैदाने उपलब्ध आहेत, परंतु या काही खाजगी गृहसंकुलांनी वर्चस्व असल्याचे दिसून येते तसेच या ठिकाणी मुलांना खेळण्यास दिले जात नाही, अशीही तक्रार नागरिकांनी केली. यावर सदरची मैदाने मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करावीत. खाजगी कार्यक्रमाचे आयोजन होत असल्यास त्यांना मा. न्यायालयाच्या निर्णयानुसार 10 दिवस उपलब्ध करुन द्यावीत व याबाबतची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे निर्देशही खासदारांनी यावेळी दिले.

तसेच या विभागामध्ये उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्या इतरत्र पडलेल्या आहेत, याबाबत विद्युत महावितरण कंपनीशी संपर्क करुन सदर केबल्स सुस्थितीत व सुरक्षित कराव्यात अशाही सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे दैनंदिन जमा होणाऱ्या घनकचऱ्याची विल्हेवाट योग्‌य प्रकारे व नियमित होण्याच्या दृष्टीकोनातून दैनंदिन दोन वेळा रस्ते सफाई करावी व जमा होणारा कचरा ही तातडीने उचलला जाईल या दृष्टीने खबरदारी घेण्यात येईल्‍ तर येत्या काही दिवसात यांत्रिकी पध्दतीने घोडबंदररोडवरील रस्त्यांची सफाई केली जाणार असल्याचे उपायुक्त मनिष जोशी यांनी बैठकीत नमूद केले.

घोडबंदररोडवर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे, याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली आहे. लवकच अवजड वाहनांच्या वाहतूकीसाठी वेळ निश्चित करुन इतर वेळेस गाड्या उभ्या करण्यासाठी ठाणे व वसई या ठिकाणी जागा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचेही खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केले.

वाघबीळ परिसरातील नागरिकांनी मांडलेल्‌या तक्रारी खासदार नरेश म्हस्के यांनी ऐकून घेवून त्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रशासनास निर्देश दिले असून प्रशासनाने याबाबत सकारात्मकता दर्शवून तातडीने समस्या सोडविण्यात येतील असे या बैठकीत नमूद केले. त्याबद्दल वाघबीळ परिसरातील नागरिकांनी खासदारांचे व महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.