Sunday, July 5 2020 8:30 am

घरोघरी तपासणीसाठी पथके वाढवा कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी करा अन्यथा कारवाई – आयुक्त विजय सिंघल

ठाणे : घरोघरी ताप तपासणीमध्ये किंवा फिव्हर क्लिनिकमध्ये तापसदृष्य लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींना केवळ औषधे देवून घरी न पाठवता त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात यावे असे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले. तथापि कंटेनमेंट झोन आणि घरोघरी सर्वेक्षणमध्ये हयगय झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
प्रभाग समितीस्तरावर घरोघरी ताप तपासणी सर्वेक्षण करण्यावर भर देवून त्यामध्ये तापसदृष्य लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींना तापाची किंवा इतर औषधे देवून त्याला घरी न पाठवता क्वारंटाईनमध्ये पाठवावे जेणेकरून कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होणार आहे असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक प्रभाग समितीमध्ये होमिओपॅथीची औषधे वितरित करण्याबरोबरच एक महिन्यानंतर त्याचा दुसरा डोस घेतला जातो किंवा कसे याचाही पाठपुरावा करण्यात यावा. त्याचप्रमाणे जे रूग्ण सापडताहेत ते सिमटोमॅटीक किंवा असिमटोमॅटीक आहेत याचीही माहिती संबंधित परिमंडळ उप आयुक्त आणि सहा. आयुक्त यांनी अद्ययावत करावी. प्रत्येक प्रभागाचे संपर्क अधिकारी यांनीही प्रत्यक्ष फिल्डमध्ये काम करावे असे यावेळी श्री. सिघल यांनी सांगितले.
केंद्र शासन आणि राज्य सरकारच्या निर्णयानुसार कंटेनमेंट झोनच्या बाहेर काही गोष्टी शिथील कराव्या लागतील हे लक्षात ठेवून कंटेनमेंट झोनमध्ये कसल्याही परिस्थितीत काहीही सुरू राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. यासाठी पोलिसाचे सहकार्य घेण्यात यावे असेही त्यांनी शेवटी सांगितले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त(1) गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त(2) संजय हेरवाडे उपस्थित होते.