Monday, April 19 2021 12:07 am

गोल्डमॅन म्हणून मिरवणाऱ्या सराईत गुन्हेगार सचिन शिंदेची भर दिवसा गोळ्या घालून हत्या

पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात गुन्हेगाराच्या हत्येची थरारक घटना घडली आहे. गोल्डमॅन म्हणून मिरवणाऱ्या सराईत गुन्हेगार सचिन शिंदेची पुण्यातील लोणीकंद गावात भर रस्त्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास लोणीकंद येथील अॅक्सिस बँकेच्याजवळ ही घटना घडली. सचिन शिंदे हा रस्त्याच्या बाजूला उभा होता, त्याचेवळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर बेछुट गोळीबार केला. यात सचिन शिंदेच्या मानेला एक गोळी लागली. गोळी लागल्यानंतर तो जागेवरच कोसळला.

भर रस्त्यावर गोळीबाराची घटना घडल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पूर्ववैमनस्यातून सचिन शिंदेची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

लोणीकंदमध्ये सचिन शिंदे हा गोल्डमॅन म्हणून ओळखला जात होता. त्याच्यावर हत्येसह अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. शिक्रापूर आणि रांजणगाव एमआयडीसी भागामध्ये त्याची काही वर्षांपासून दहशत होती. एका प्रकरणात तो येरवडा तुरुंगात होता. काही दिवसांपूर्वीच तो येरवडा तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता. हीच संधी साधून हल्लेखोरांनी सचिनवर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.