ठाणे, 13 :- शेती व्यवसाय करताना होणारे अपघातामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते. अशा कुटुंबियांच्या वारसदारांना विमा संरक्षण देणारी राज्य शासनाची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येत होती. परंतु विमा कंपन्यामार्फत विमा दावे मोठ्या प्रमाणावर नामंजूर करण्यात येत होते. त्यामुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून थेट कृषी विभागामार्फत राबविण्यात येणारी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना दि.19 एप्रिल 2023 पासून राबविण्यात येत आहे.
जुन्या योजनेमध्ये विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, उंचावरून पडून मृत्यू, सर्पदंश/विंचूदंश, रस्ता /रेल्वे अपघात, जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणाने विषबाधा, खून, दंगल, नक्षलाईटकडून झालेल्या हत्या, जनावरांचा हल्ला इत्यादी अपघातांचा समावेश होता. मात्र नव्या सानुग्रह योजनेत शासनाने बाळंतपणातील मृत्यू या बाबींचाही समावेश केला आहे. कोकण विभागातील सह्याद्रीच्या जवळील भागात राहणाऱ्या तसेच पालघर, ठाण्यातील आदिवासींमध्ये संस्थात्मक बाळंतपणाचे प्रमाण अत्यल्प असते. त्यांना बाळंतपणातील मृत्यू याचा वारंवार सामना करावा लागतो. अशा गरजू वारसदारांसाठी ही योजना अतिशय लाभदायी ठरू शकते.
वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्याच्या कुटूंबातील वहितीधारक खातेदार म्हणून यापैकी कोणतीही व्यक्ती) असे 10 ते 75 वयोगटातील एकूण 2 जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह विमा योजनेद्वारे विमा संरक्षणाचा लाभ घेता येईल.
या योजनेंतर्गत अपघाताने मृत्यू झाल्यास, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा पाय निकामी झाल्यास, अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा पाय निकामी झाल्यास 2 लाख रुपये तसेच अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपये नुकसान भरपाई मिळेल.
वारसदार यांनी अपघातानंतर सर्व निर्धारित कागदपत्रांसह संबंधित कृषी सहाय्यकामार्फात तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रस्ताव 30 दिवसाच्या आत सादर करावा तसेच या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या कोकण विभाग, ठाणे विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.