Wednesday, March 26 2025 5:13 pm

गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांचा सुटकेचा निःश्वास.. आमदार संजय केळकर यांचे अनेकांनी मानले आभार

ठाणे, १३ – क्लस्टर योजनेमुळे अधिकृत धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावांना परवानगी देण्यात येत नव्हती. आता क्लस्टर योजनेची सक्ती दूर झाली. तेव्हा, आ.संजय केळकर यांच्यामुळेच गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांचा गुदमरलेला श्वास मोकळा झाल्याच्या भावना अनेक रहिवाश्यांना हौसिंग फेडरेशनकडे व्यक्त केल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी सांगितले.
ठाणे शहरात क्लस्टरला सुरुवात झाल्यापासून वेगवेगळ्या मुद्द्यावर अधिकृत इमारती आणि गृहनिर्माण संस्थांना क्लस्टरमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात मतभेद होते. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांनी याविषयी बर्‍याचदा निवेदनाद्वारे क्लस्टरमधून वगळण्याची मागणी केली होती. मात्र, शासनाने त्याची दखल घेतली नाही. अखेर,आ. संजय केळकर यांनी वारंवार या विषयावर गृहनिर्माण संस्थांचे सभासद, पदाधिकारी, महापालिका आयुक्त, नगरविकास मंत्री, उपमुख्यमंत्री तसेच, मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून बैठका घेतल्या. तसेच, हिवाळी अधिवेशनामध्येही आक्रमक भूमिका घेऊन यासंदर्भात बाजू मांडली होती. त्याचेच फलीत म्हणून शासनाला अधिकृत असलेल्या इमारतींना त्याचबरोबर, नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांना समूह विकास योजना म्हणजेच क्लस्टरमधून वगळणे भाग पडले आहे. या अनुषंगाने सहकारी गृहनिर्माण संस्थामधील जीव मुठीत धरून बसलेल्या सर्व रहिवाशी तथा सभासदांनी, मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री आणि आ. संजय केळकर यांचे विशेष आभार मानले आहेत. दरम्यान,आ.केळकर यांच्या प्रयत्नामुळेच आमचा गुदमरलेला श्वास मोकळा झाल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी या संदर्भात फोनवर संपर्क साधुन वैयक्तिकरित्या चर्चा करून आ.केळकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. अशी माहिती ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली.