Sunday, April 18 2021 11:00 pm

गुन्ह्याच्या चार्जशीटमध्ये व्हाईटनर लावून खाडाखोड केल्याने पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन

चिंचवड :  गुन्ह्याच्या चार्जशीटमध्ये व्हाईटनर लावून कलम खोडून आरोपीला मदत केल्याचा ठपका ठेवत चाकण पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचा-याचे निलंबन करण्यात आले आहे.

याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मंगळवारी (दि.९) रात्री उशिरा आदेश दिले.
पोलीस नाईक अशोक रामचंद्र जायभाये (नेमणूक – चाकण पोलीस स्टेशन) असे निलंबन झालेल्या पोलिसाचे नाव आहे.

चाकण पोलीस ठाण्यात जुलै २०२० मध्ये एक गुन्हा दाखल आहे. त्यात 326 हे कलम लावणे अभिप्रेत होते. मात्र ते कलम या प्रकरणात जाणीवपूर्वक लावण्यात आले नाही. त्यानंतर या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करताना दोषारोपपत्र आणि इतर कागदपत्रांवर व्हाईटनरचा वापर करण्यात आला.

गुन्ह्याच्या चार्जशीटमध्ये खाडाखोड करून व्हाईटनरने सरकारी दस्तऐवजात बदल केले. संबंधित गुन्ह्यात आरोपीला सगळ्या प्रकारापासून वाचण्यास मदत करण्याच्या हेतून हे कृत्य केल्याचे दिसून येत असल्याने पोलीस नाईक अशोक जायभाये याने पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

दरम्यान, प्रशिक्षण शिबीर टाळण्यासाठी तीन पोलीस कर्मचारी वरिष्ठांच्या परस्पर जाणीवपूर्वक रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केल्याचा ठपका ठेवत त्या कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्तांनी तडकाफडकी निलंबन केले होते. त्याचे आदेश सोमवारी काढले होते. लगेच दुस-या दिवशी (मंगळवारी) आणखी एका पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे. यामुळे कर्तव्यात कसूर करणा-या पोलिसांच्या चुकीला पोलीस आयुक्तांकडून माफी नसल्याची चर्चा शहर पोलीस दलात सुरु आहे.