Thursday, August 22 2019 4:53 am

गल्लीबोळात शिरून गुन्हेगारांना पकडणं आता मुंबई पोलिसांना शक्य होणार

मुंबई-: मुंबई पोलिसांना लवकरच मुंबई पोलीस ई-सायकलचा वापर करणार आहेत. त्यामुळे चारचाकी, दुचाकी जाऊ न शकणाऱ्या भागात जाणं पोलिसांसाठी सोपं होणार आहे. मुंबई पोलिसांना मिळणाऱ्या ई-सायकल बॅटरीवर चालणार आहेत. ई-सायकल्सची चाचणी नुकतीच पूर्ण झालीअसून, या सायकलचा वेग प्रतितास 25 किलोमीटर इतका आहे. गस्त घालण्यासाठी पोलीस या सायकल्सचा वापर करतील. एकदा चार्ज केल्यावर ही सायकल तीन तास चालू शकेल. यानंतर ती पुन्हा एकदा तासभर चार्ज करावी लागेल. ‘गस्त घालताना पोलीस कर्मचारी ई-सायकलचा वापर साध्या सायकलप्रमाणे करू शकतील. त्यावेळी पँडल मारून सायकल चालवता येईल. ज्यावेळी वेगानं सायकल चालवण्याची गरज असेल, तेव्हा बॅटरीचा वापर करता येईल. त्यामुळे सायकलचा वेग वाढेल,’ अशी माहिती समोर आली आहे.

‘मुंबईची लोकसंख्या प्रचंड आहे. अनेक भागातील रस्ते अतिशय लहान आहे. गल्लीबोळात पोहोचून गुन्हेगारांना पकडायचं झाल्यास तिथे दुचाकी नेणं शक्य नाही. अशा भागांमध्ये ई-सायकलच्या मदतीनं पोहोचता येऊ शकतं,’ असं सूत्रांनी सांगितलं. सायकल चालवल्यामुळे पोलीस फिट राहतील आणि शहरातलं प्रदूषणही कमी होईल, असं सहआयुक्त देवेन भारतींनी सांगितलं.