Saturday, July 11 2020 9:26 am

गल्लीतील दोन मित्रांतील भांडण सोडविणे एकाच्या जिवावर बेतलं

मुदखेड -: मुदखेडच्या कुंभार गल्लीत मंगळवारी रात्री आठच्या दरम्यान सार्वजनिक ठिकाणी बालाजी रामजी तेलंगे व केशव नारायण तेलंगे हे मित्र काही कारणावरून आपापसांत भांडण करीत एकमेकांना मारून घेत होते. हा प्रकार त्यांचा मित्र बालाजी देवराव तेलंगे (वय २२, रा. कुंभार गल्ली) याच्या निर्दशनास आला.

गल्लीतील दोन मित्रांतील भांडण सोडविणे एकाच्या जिवावर बेतल्याची घटना मंगळवारी (ता. पाच) रात्री मुदखेड येथे घडली. भांडण सोडविण्यास गेलेल्या मित्राचा जागीच मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.भांडण सोडविण्यास त्याने मध्यस्थी केली. ‘आमच्या भांडणात तू कशाला आलास, तुला काय करायचे’ असे म्हणून एकाने बालाजी देवराव तेलंगे यांच्या गुप्तांगावर जोराची लाथ मारली. त्यामुळे तो जागीच कोसळला. नातेवाइकांसह नागरिकांनी त्यास मुदखेड ग्रामीण रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुदखेड पोलिसांत दोघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. संशयित बालाजी रामजी तेलंगे व केशव नारायण तेलंगे यांना अटक करण्यात आली.