Monday, January 27 2020 8:15 pm

गणेश नाईक यांची मोठ्या जाहीर कार्यक्रमात भाजपमध्ये होणार ‘ग्रँड एन्ट्री’?

नवी मुंबई : ऐरोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असून  माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते  गणेश नाईक माजी आमदारांबरोबर पक्षांतर करतील का ? अशी  शंका उपस्थित होत आहे.   गणेश नाईक  हे  मोठ्या जाहीर कार्यक्रमात  भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील  अशी शक्यता असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. नाईक आपल्या समर्थक नगरसेवकांसह ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्त्य्यांनाही आपल्या सोबत भाजपत नेणार असल्याचे समजते. याचमुळे आजच्या भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमात संदीप नाईक यांच्यासोबत नवी मुंबईतील नाईक समर्थक नगरसेवकांचाही आज भाजप प्रवेश झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.  गणेश नाईक सुरुवातीपासूनच भाजप प्रवेशाबाबत फारसे उत्सुक नसल्याच्या बातम्या कालच प्रसारित झाल्या होत्या. मात्र, आमदार संदीप नाईक आणि राष्ट्रवादीच्या नवी मुंबईतील ५२ नगरसेवकांनी नाईक यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते भाजपत प्रवेश करतील अशा बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्यानंतर मात्र नाईक यांनी भाजपत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. गणेश नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील वजनदार नेते असून त्यांना साजेसा असा पक्ष प्रवेश व्हावा अशी नवी मुंबईतील कार्यकर्त्यांची इच्छा असल्याने ते वाजतगाजत दिमाखात पक्षांतर करणार असल्याचे समजते. नाईक सध्या ठाण्यात ठाण मांडून बसले असून ते समर्थकांची चाचपणी करण्याच्या कामात गुंतले असल्याचे बोलले जात आहे. लवकरच त्यांच्या प्रवेशाची तारिख जाहीर केली जाईल असे सूत्रांनी सांगितले.