Thursday, December 5 2024 6:47 am

गणपतीसाठी चाकरमान्यांचा कोकण प्रवास होणार सुखाचा

आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर २०२ विशेष ट्रेन च्या फेऱ्या…

ठाणे, 31 कोकणात गणेशोत्सवासाठी रेल्वेने जाणाऱ्या ठाणे-मुंबईतील चाकरमान्यांची एकच गर्दी उसळते, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आमदार संजय केळकर यांनी याबाबत रेल्वे मंत्रालयाला पत्र दिल्यानंतर कोकणासाठी २०२ विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे चाकरमान्यांचा कोकण प्रवास आता सुखाने आणि वेगाने होणार आहे.

कोकणातील गणेशोत्सव आणि ठाणे मुंबईतील चाकरमानी हे नाते अतूट आहे. गणेशोत्सवाच्या तीन महिने आधीच कोकणात गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची जागा आरक्षित करण्यासाठी एकच स्पर्धा सुरू होते. मात्र प्रवाशांची संख्या वाढत असल्याने कोकणात जाणाऱ्या उपलब्ध ट्रेन या कमी पडतात. त्यामुळे अनेकांना आरक्षण मिळत नाही तर तुडुंब गर्दीमुळे रेल्वेचा प्रवास खडतर आणि हाल अपेष्टा सोसत करावा लागतो.

हजारो चाकरमान्यांची ही परवड थांबवण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी वेळीच रेल्वे मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून विशेष अतिरिक्त ट्रेन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून मंत्रालयाने त्यांना नुकतेच २०२ विशेष ट्रेनच्या फेऱ्या उपलब्ध करून दिल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.

सीएसएमटी ते सावंतवाडी १८ फेऱ्या, सावंतवाडी ते सीएसएमटी १८ फेऱ्या, सीएसएमटी ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते सीएसएमटी प्रत्येकी १८ फेऱ्या, दिवा-चिपळूण आणि चिपळूण-दिवा प्रत्येकी १८ फेऱ्या, सीएसएमटी ते कुडाळ आणि कुडाळ ते सीएसएमटी प्रत्येकी तीन फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ आणि कुडाळ ते लोकमान्य टिळक टर्मिनस प्रत्येकी १८ फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी आणि सावंतवाडी ते लोकमान्य टिळक टर्मिनस प्रत्येकी १८ फेऱ्या, तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ आणि कुडाळ ते लोकमान्य टिळक टर्मिनस प्रत्येकी आठ फेऱ्या या प्रमाणे २०२ फेऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

या वाढीव विशेष ट्रेनमुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास वेगाने आणि सुखाने होणार असून विविध प्रवासी संघटनांनी आमदार संजय केळकर यांचे आभार मानले आहेत.