Monday, January 27 2020 2:52 pm

गडकिल्ल्यांवर रिसॉर्ट:  ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसना केला घंटानाद

ठाणे –  हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी महाराष्ट्रातील 25 गडकिल्ल्यांचे रुपांतर हेरिटेज हॉटेल आणि विवाह स्थळांमध्ये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले. दरम्यान, ‘शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर नंगानाच करु देणार नाही.  एकाही किल्ल्यावर असे रिसॉर्ट आम्ही उभारुन देणार नाही’, असा इशारा आ. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिला.
गड किल्ल्यांवर रिसॉर्ट आणि हॉटेल्स उघडून त्यावर मद्यपान आणि इतर काही गोष्टी करण्याची मुभा हे सरकार देत आहे, असा आरोप करीत ‘तुघलकी सरकारचा निषेध असो, महाराष्ट्राच्या आधुनिक औरंगजेबाचा  निषेध असो, मुर्दाबाद- मुर्दाबाद युती सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घंटानाद केला. यावेळी आ. आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकारच्या या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला. ते म्हणाले, गड किल्ल्यांचा इतिहास हा आमच्या पूर्वजांच्या रक्तातून लिहिला गेलेला आहे. किल्ल्यांवरील माती आमचे ऊर्जास्त्रोत आहे. जिथे मॉसाहेबांचे, शिवरायांचे, संभाजी राजांचे पाय लागले. त्या मातीवर नंगानाच होऊ देणार नाही. या सरकारला आम्ही आता घंटानाद करायला लावू.
या आंदोलनात ठाणे विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, ब्लॉक अध्यक्ष रविंद्र पालव, समीर पेंढारे, दत्तात्रय जाधव, निलेश कदम, निलेश फडतरे, सरचिटणीस संतोष तिवारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजय पवार, समाधान माने, ब्लॉक कार्याध्यक्ष प्रदिप झाला, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष कैलास हावळे, वॉर्ड अध्यक्ष सुमित गुप्ता, जितेंद्र मिश्रा, युवक कार्याध्यक्ष चेतन पाटील, युवक विधानसभा अध्यक्ष दिपक पाटील, युवक उपाध्यक्ष संकेत नारणे, युवक वॉर्ड अध्यक्ष जावेद शेख, महेश भाग्यवंत आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.