Monday, September 28 2020 1:35 pm

गटनेत्यांच्या बैठकीला आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती ही राज्य शासनाच्या निर्देशानुसारच पालिका प्रशासनाकडून वस्तुस्थितीदर्शक स्पष्टीकरण

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल यांनी गटनेत्यांच्या बैठकीस ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’ द्वारे भाग घेऊन आणि प्रत्यक्ष उपस्थित न राहता टाळाटाळ केली, या आशयाचे वृत्त प्रसारमाध्यमांमधून प्रकाशित झाले आहे. यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने पुढीलप्रमाणे वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात समिती सभागृहात काल (दिनांक १० ऑगस्ट २०२०) दुपारी चार वाजता माननीय गटनेते यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये महानगरपालिका आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ द्वारे उपस्थिती लावली. राज्य शासनाच्या वतीने दिनांक ३ जुलै २०२० रोजी निर्गमित अधिसूचना क्रमांक कोरोना-२०/प्र. क्र. ७६/न. वि. १४ अन्वये महानगरपालिकेच्या विविध सभा ‘व्हि‍डिओ कॉन्फरन्स’द्वारेच घेण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की, कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांनी सर्व बैठका केवळ ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारेच घ्याव्यात. ही अपवादात्मक परिस्थिती असल्यामुळे महापालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकाही या ‘व्हि‍डिओ कॉन्फरन्स’द्वारे घेण्यात येत आहेत. कोरोना महामारीत शासनाने आणि महानगरपालिकेने विविध तज्ञ मान्यवरांच्या समित्या गठित केल्या असून, या समित्यांच्या बैठकाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केल्या जातात.

शासनाच्या निर्देशांचे परिपूर्ण पालन करून महानगरपालिका आयुक्त श्री. चहल यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे गटनेत्यांच्या बैठकीला उपस्थिती लावली होती. महापालिका आयुक्तांना लोकप्रतिनिधींबद्दल पूर्णतः आदर आहे. त्यांच्या बैठकीस महापालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष उपस्थित राहण्यात टाळाटाळ केली, या आरोपात कोणतेही तथ्य नाही, असे महानगरपालिकेच्या वतीने पुन्हा स्पष्ट करण्यात येत आहे.