Tuesday, June 2 2020 3:57 am

खेळाचे मैदान वाचवण्यासाठी महापालिका शाळेतील विध्यार्थी रस्त्यावर शाळेच्या मैदानावर डाटा सेंटरची उभारणी

  ठाणे :  स्मार्ट सिटीच्या ठाण्यात शालेय विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानच शिल्लक राहिले नसून, आम्हाला आमच्या हक्काचे मैदान पुन्हा परत करा अन्यथा आम्ही आमरण उपोषण करू असा इशारा देत हाजुरी येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक 126,32 शाळेतील विध्यार्थीनी सोमवारी ठाणे महापालिकेवर मोर्चा काढला. शाळेच्या मैदानाच्या जागेवर डाटा सेंटर उभारण्याचे काम सुरू असून यामुळे मैदान नाहीसे होणार आहे. सदर बांधकामामुळे शाळेच्या समोर उपलब्ध असलेले मैदान पुर्णपणे बाधीत होत असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होणार असल्याचे या विद्यार्थ्यांचे यावेळी सांगितले.
      हाजुरी येथे ठाणे महापालिकेची उर्दू शाळा आहे. या शाळेत आजूबाजूच्या परिसरातील हजारो विध्यार्थी शिक्षण घेत असतात. या ठिकाणी पहिले ते आठवी पर्यंत वर्ग भरले जात असुन सकाळी आणि दुपारच्या सत्रात वर्ग भरले जातात. याच शाळेच्या मैदानावर प्रशासनाच्या वतीने डाटा सेंटरची इमारत बांधण्यात येत असून त्या पद्धतीने काम सुरू आहे. दरम्यान तेथे गेले अनेक वर्षे अस्तित्वात असलेल्या शाळेचे मैदान पुर्णपणे बाधित होणार असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्या विध्यार्थीनी सांगितले. त्याठिकाणी शाळेच्या मैदानावर स्वतंत्र दिन, प्रजासत्ताक दिन, शारीरिक शिक्षणाचे कार्यक्रम, कवायती यासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात, मात्र भविष्यात मैदानच शिल्लक राहणार नसल्याने विद्यार्थ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.
         शालेय विद्यार्थ्यांना ज्याप्रकारे शालेय अभ्यास महत्वाचा असतो. तितकाच त्यांना शालेय शिक्षण, मैदानी खेळ महत्वाचे असतात. सदर बांधकामामुळे शाळेच्या समोर उपलब्ध असलेले मैदान पुर्णपणे बाधीत होत असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. सदर प्रकरणात गेले अनेक दिवस विद्यार्थ्यांचे पालक, सामाजिक, कार्यकर्ते यांच्यावतीने पाठपुरावा, उचित प्रकारे पत्रव्यवहार केला जात असून सुध्दा प्रशासनाच्या वतीने त्यांना कोणत्याच प्रकारचे सहकार्य आणि त्यांच्या मागणीला न्याय दिला जात नाही. दरम्यान न्याय मिळाला नाही तर आम्ही ठामपा प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण पुकारु आणि यास पुर्णपणे ठाणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा यावेळी विद्यार्त्यानी दिला.