Tuesday, July 23 2019 2:55 am

खेलो इंडिया ऑलिम्पिक प्रदर्शनास मोठा प्रतिसाद

पुणे-: खेलो इंडिया स्पर्धेच्या निमित्ताने पुण्यात भरलेल्या ऑलिम्पिक प्रेरणा प्रदर्शनास मोठा प्रतिसाद मिळत आहे. क्रीडालेखक, क्रीडा अभ्यासक संजय दुधाणे यांनी हे प्रदर्शन आयोजित केले आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही, सिंधूंने रिओ स्पर्धेत खेळलेले शटल, मेरी कोमने सरावासाठी वापरलेले ग्लोव्हज्, लिएंडर पेसने विक्रमी 7 वे ऑलिम्पिक खेळताना मारलेला टेनिसचा चेंडू, खाशाबा जाधव आणि बाबू निमल यांनी जिंंकलेले ऑलिम्पिक पदक, 70 दुर्मिळ छायाचित्रांची 50 पोस्टर हा ऑलिम्पिकचा खजिना खेलो इंडियाच्या निमित्ताने सुरू होणार्‍या ऑलिम्पिक प्रेरणा प्रदर्शनात पहाण्याची पर्वणी देशभरातील खेळाडूंनी मिळत आहे.


बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू झालेल्या या प्रदशर्नाचे उद्घाटन क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ऑलिम्पिक प्रदर्शनाचे संग्रहक संजय दुधाणे,अजीत बाबू निमल, अमरजीत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले पहिले खाशाबा जाधव यांचे 1952 हेलसिंकी स्पर्धेतील कांस्यपदक तर मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या बाबू निमल यांनी 1936 बर्लिन ऑलिम्पिकमध्यूे जिंकलेले हॉकीतील सुवर्णपदक प्रदर्शनात पहाण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. खाशाबा जाधव व बाबू निमल या ऑलिम्पिकवीरांनी ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात परिधान केलेले ब्लेझरही प्रदर्शनात लक्षवेधी ठरत आहे.
ऑलिम्पिक प्रदर्शनात भारताने ऑलिम्पिकममध्ये 1900 ते 2016 पर्यंतच्या गेल्या 116 वर्षांत जिंकलेल्या पदकांची गाथा पहाता येईल. लंडन व रिओ ऑलिम्पिकचे वृत्तांकन करणारे क्रीडालेखक व क्रीडा पत्रकार प्रा. संजय दुधाणे यांनी संकलित केलेल्या ऑलिम्पिकमधील भारत हे छायाचित्रांचे प्रदर्शन यंदाच्या क्रीडा महोत्सवाचे वैशिष्ट असून संग्रहित केलेले 25 पेक्षा अधिक ऑलिम्पिक वस्तू प्रदर्शनात झळकत आहे. लंडन व रिओ ऑलिम्पिकची स्मृतिचिन्हे, चलनी नाणी, पोस्टाची तिकिटे, उद्घाटन सोहळ्याचे तिकिट, ऑलिम्पिक पोस्टाची तिकिटे प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे.