Friday, February 14 2025 8:25 pm

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पुरेसे बियाणे आणि खत साठा उपलब्ध

जमिनीत पुरेशी ओल आणि पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये
– कृषी विभागाचे आवाहन

ठाणे, दि. १७ (जिमाका): खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पुरेसे बियाणे आणि खत साठा उपलब्ध असून त्याची टंचाई जाणवणार नाही. शेतकऱ्यांनी भात आणि नागली रोपवाटिका तयार करण्यासाठी जमिनीत पुरेशी ओल आल्याशिवाय आणि पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

जिल्ह्यात १६ जून २०२२ अखेर सरासरी १३ टक्के पाऊस झाला आहे. भात, नागली, वरी या प्रमुख तीन पिकांसाठी पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. १६ जून पर्यंत भात पिकाची ०.१९ टक्के पेरणी झाली असून नागली ०.३९ आणि वरी ०.४ टक्के पेरणी झाली आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी सांगितले. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहनही श्री. वाघ यांनी केले आहे.

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून जिल्ह्याची एकूण मागणी १२ हजार ४८९ मेट्रीक टन असून महिनानिहाय मंजूर आवंटन ३३३३ मेट्रीक आहे. जिल्ह्यात सध्या युरिया २५३३ मेट्रीक टन शिल्लक असल्याचे श्री. वाघ यांनी सांगितले.

महाबीजकडून संकरित आणि सुधारित वाणांच्या बियाणे एकूण २१२८ क्विंटल तर खासगी ११ हजार क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुरेसे बियाणे उपलब्ध असल्याचे कृषि विभागामार्फत कळविण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये ११२ कृषी सेवा केंदातून खतांची आणि १२० कृषी सेवा केंद्रांतून बियाण्यांची विक्री होत आहे.

खरीप हंगामासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सेस फंडातून ८०० क्विंटल बियाणे शेतकरी बांधवांना ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाते. शेतकऱ्यांनी खते, बियाणे, किटकनाशके खरेदी करतांना अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडून निविष्ठांची खरेदी करावी. या निविष्ठांचे पक्के बिल घ्यावे आणि ते तसेच पॅकींग मटेरिअल कापणी पर्यंत जतन करून ठेवण्याचे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.

राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून कमी उत्पादकता गावात भातपिकाचे रत्नागिरी- ८ वाणाचे प्रमाणीत बियाण्याचे भात पिकांचे पिक प्रात्यक्षिके ५८० हेक्टर क्षेत्रावर राबविण्यात येत असून २३२ क्विंटल ५० टक्के अनुदानावर वाटप करण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून भात व नागली पिकाची उत्पादकता कमी असलेल्या गावातील शेतकऱ्यांना १० वाणाच्या आतील सुधारीत प्रमाणीत रत्नागिरी ६, ८ या बागांचे १२८ हेक्टर क्षेत्रावर भात व ५५० क्षेत्रावर नागली पिकांचे पिक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. भात ५१.२० क्विंटल आणि नागली २७.५० क्विंटल ५० टक्के अनुदानावर वाटप करण्यात येत आहे, असे श्री. वाघ यांनी सांगितले.
००००