Tuesday, June 2 2020 3:21 am

खड्डयांमुळे अपघातात डॉक्टर तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

भिवंडी :- भिवंडी वाडा मनोर महामार्गावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यात पडून दुकाचीवरील डॉ.नेहा शेख या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघातात मरण पावलेली तरुणी कुडूस येथील आहे. भिवंडीतून स्वतःच्या लग्नाची खरेदी करून आपल्या भावासोबत ऍक्टिव्हा बाईक वरून परतत असताना भिवंडी – अंबाडी रस्त्यामध्ये अंबाडी जवळील दुगाड फाटा येथे रात्री 10.45 वाजता हा अपघात झाला.

याबाबत माहिती मिळताच श्रमजीवी संघटनचे युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार आणि त्यांचे सहकारी तरुण यांनी संतप्त होऊन या घटनेचा निषेध करत अनगाव टोल नाका रात्री 12 वाजता बंद केला.

रस्ता पूर्ण दुरुस्त करा आणि या रस्त्याची ठेकेदार कंपनी सुप्रिम इन्फ्रा कंपनी अधीकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे जबाबदार अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी श्रमजीवीचे प्रमोद पवार यांनी केली.तोपर्यंत टोल चालू करू देणार नाही असे त्यांनी सांगितले.

याबाबत श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांसोबत सामाजिक कार्यकर्ते असगर पटेल, अविनाश राऊत, भूषण घोडविंदे, श्रमजीवी टॅक्सी युनियनचे भुषण पाटील, शैलेश पाटील,अल्पेश पाटील, मोहम्मद भाबे यांसह शेकडो तरुण टोलनाक्यावर रात्री जमा झाले होते.