Saturday, April 20 2019 12:11 am

खंडाळ्यात मदुराई एक्स्प्रेसचा डबा घसरला , काही रेल्वे गाडया रद्द

पुणे : मुंबई-पुणे लोहमार्गावर खंडाळा रेल्वे स्टेशनजवळ मदुराई एक्स्प्रेसचा मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास अपघात झाला. यामुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. या अपघातामुळे पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस, पुणे-कर्जत व कर्जत पुणे शटल, भुसावळ पुणे एक्स्प्रेस व मुंबई पुणे, पुणे मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

मदुराई एक्सप्रेस पुण्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. दुराई एक्स्प्रेस खंडाळा घाट चढून येत असताना खंडाळा रेल्वे स्टेशनजवळ गाडीच्या मागील बँकरची जोरदार धडक मागील डब्याला बसल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घसरलेला डब्बा मार्गावरुन हटवण्यात आला असून पावणेसहाच्या सुमारास मदुराई एक्सप्रेस पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. मात्र, या अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरु आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाडया १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असून काही रेल्वे गाडया रद्द करण्यात आल्या आहेत.