मुंबई, दि. १५ : राज्यात कौशल्य विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य अभिजित वंजारी यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
मंत्री श्री. लोढा म्हणाले की, बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाने कौशल्य विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्याला प्राधान्य दिले आहे. यासाठी १२०० कोटी रूपये खर्च करून ४१८ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर कोणते अभ्यासक्रम महत्त्वाचे आहेत याबाबत स्थानिकांचे मत विचारात घेऊन एक, दोन, तीन महिन्यांचे विविध अभ्यासक्रम तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कमी लोकसंख्येच्या गावात ५०० कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येत आहेत. नोंदणीकृत बेरोजगारांपेक्षा नोंदणी न केलेल्यांची संख्या अधिक असून कौशल्य विकास केंद्रांचा त्यांना लाभ होईल असे मंत्री श्री.लोढा म्हणाले. रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून तसेच विविध आस्थापनांशी सामंजस्य करारांच्या माध्यमातून ४२ हजार जणांना रोजगार उपलब्ध झाले आहेत. यापुढे नवीन ॲप विकसित करून त्यावर रिक्त जागांची माहिती ठेवण्याची सूचना कंपन्यांना करण्यात येईल.
राज्यात २०० कोटी रुपयांचा नाविन्यता निधी तयार करण्यात आला असून यातील २० टक्के निधी आयटीआयसाठी, तर २० टक्के निधी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
या संदर्भात झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, प्रवीण दटके, अनिकेत तटकरे, सतीश चव्हाण, प्रवीण दरेकर, सचिन अहिर, किरण सरनाईक आदींनी सहभाग घेतला.