Saturday, September 18 2021 1:32 pm
ताजी बातमी

कोवीडमुळे पती गमावलेल्या विधवा महिलांसाठीस्वयंरोजगार प्रशिक्षणासंदर्भात प्रस्ताव तयार करावा- उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे

ठाणे,: कोवीडमुळे पतीचे निधन झाल्यामुळे विधवा झालेल्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ तत्काळ मिळण्यासाठी जलदगतीने कार्यवाही करावी. तसेच अशा महिलांना कायमस्वरुपी स्वयंपूर्ण करण्यासाठी रोजगारक्षम प्रशिक्षण देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश उपजिल्हाधिकारी (सामान्य) गोपीनाथ ठोंबरे यांनी आज येथे दिले.

कोवीड 19 च्या प्रादुर्भावामुळे एकल/विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्यासंदर्भात स्थापन झालेल्या जिल्हास्तरीय कृती समितीची चौथी बैठक आज उपजिल्हाधिकारी श्री. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी महेंद्र गायकवाड, उल्हानगर महानगरपालिकेच्या उपायुक्त प्रियंका राजपूत, उपशिक्षणाधिकारी ललिता कवडे, सहायक पोलीस आयुक्त जगदीश सातव, प्रकाश निलेवाड, ठाणे जिल्हा परिषदेचे उप कार्यकारी अधिकारी (बालकल्याण), तहसिलदार सुरेंद्र ठाकूर, महिला व बालकल्याण अधिकारी संजय खंडागळे, बालविकास प्रकल्प अधिकारी अशोक बागूल यांच्यासह महानगरपालिका, पोलीस, जिल्हा परिषद आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा घेऊन श्री. ठोंबरे म्हणाले की, कोवीडमुळे अनेकांची परिस्थिती हालाखीची झाली आहे. अनेक घरांमध्ये कर्ता पुरुष निधन पावल्यामुळे अनेक महिला निराधार झाल्या आहेत, तसेच बालके अनाथ झाली आहेत. त्यामुळे अशा लोकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी सर्व यंत्रणांनी संवेदनशीलपणे काम करण्याची गरज आहे. कोवीडमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या 1046 मुलांची नोंद झाली आहे. त्यापैकी 383 बालकांना बालसंगोपन योजनेचे आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित बालकांपर्यंत पोचून त्यांना तातडीने मदत करावी.

अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणासाठी जीएम फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेमार्फत मदत करण्यात येत आहे. आतापर्यंत 66 बालकांच्या माहितीचे प्रस्ताव तयार आहेत. ही मदत संबंधित बालकांपर्यंत पोचावी, यासाठी शिक्षण विभागाने त्या मुलांच्या शाळांशी समन्वय साधावा, असे निर्देशही श्री. ठोंबरे यांनी दिले.

कोवीडमुळे पतीचे निधन झालेल्या 945 महिलांची माहिती संकलित करण्यात आली आहे. यापैकी 66 महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी तातडीने पूर्तता करावी. तसेच अशा महिलांना स्वयंपूर्ण व सक्षम करण्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. याद्वारे या महिला स्वतः काम करून घर चालवू शकतील. तसेच या महिलांना रोजगार मिळण्यासाठी एमआयडीसीमधील विविध कंपन्यांशी संपर्क साधून योजना तयार करावी, असेही श्री. ठोंबरे यांनी यावेळी सांगितले.

कोवीड काळात बालकांच्या संरक्षणाचा प्रश्नही समोर आला आहे. यामुळे राज्य शासनाने प्रत्येक महानगरपालिकेमध्ये वॉर्डनिहाय बालसंरक्षण समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांनी तातडीने वॉर्डस्तरीय संरक्षण समित्यांची स्थापना करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

अनाथ बालिकेस शासनाकडून मदत

यावेळी दोन्ही पालक गमावलेल्या कु. तन्वी गांधी या बालिकेस उपजिल्हाधिकारी श्री. ठोंबरे यांच्या हस्ते अनाथप्रमाणपत्र देण्यात आले. कु. तन्वी हीस प्रधानमंत्री केअर योजनेतून तसेच राज्य शासनाच्या वतीनेही आर्थिक मदत देण्यात आली. महिला व बाल विकास विभागामार्फत तिला दरमहा 1125 रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास अधिकारी श्री. गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका ज्योत्स्ना जयवंत भोईर यांचे कर्तव्य बाजवत असताना कोवीड संसर्गामुळे निधन झाले. त्यांच्या वारसांना आज राज्य शासनाच्या सानुग्रह अनुदानाचा पन्नास लाख रुपयांचा धनादेश श्री. ठोंबरे यांच्या हस्ते देण्यात आला.