Tuesday, July 7 2020 1:01 am

कोरोनो व्हायरसपासून वाचण्यासाठी नवी मुंबईतील एपीएमसी आठवड्यातील दोन दिवस बंद राहणार

नवी मुंबई : एपीएमसीच्या पाचही मार्केटमध्ये रोज तब्बल 50 हजार लोकांची होणारी आवक जावक 50 टक्क्यांनी कमी करण्यासाठी व्यापारी प्रयत्न करत आहेत. कोरोनापासून वाचण्यासाटी आठवड्यातील दोन दिवस एपीएमसी बंद ठेवण्यात येणार आहे. तसंच ग्राहकांनी एपीएमसीमध्ये न येता फोनवर ऑर्डर द्यावी, अशी विनंती होलसेल व्यापारी करत आहेत.

शीघ्र नाशवंत माल असल्याने एपीएमसी मार्केट रोज बंद ठेवणे शक्य नाही. बंद केल्यास शेतकरी वर्गाचे लाखोंचे नुकसान होऊ शकते तर दुसरीकडे शहरातील ग्राहकांना जीवनावश्यक वस्तू मिळणे दुरापास्त होण्याची शक्यता असल्याने एपीएमसी आठवड्यातून दोन दिवस बंद ठेवले जाणार आहे. एपीएमसीमधील गर्दी कमी करण्यासाठी आणि रोग प्रतिबंधक उपाय करण्यासाठी गुरुवार आणि रविवार एपीएमसी बंद करुन स्वच्छ करण्यात येणार आहे. मार्केटच्या गेटवर सॅनिटाझजरच्या बॉटल ठेवण्यात येणार असून येणाऱ्या प्रत्येकाला मास्क किंवा रुमाल लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये हजारोच्या संख्येने किरकोळ व्यापारी शेती माल खरेदी करण्यासाठी येत असतात. मात्र आता त्यांना मार्केटमध्ये न येण्याचा सल्ला देण्यात आला आहे. व्यापारी आपल्या टेम्पोनी ग्राहकांपर्यंत त्यांचा माल पोहोचवणार आहेत. एपीएमसीमधील आवक जावक कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.