– विधानसभा निवडणुकीत जाहीर केला बिनशर्त पाठींबा
ठाणे, 12 : निवडणुकीची रणधुमाळी सुरु होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. मात्र खुद्द शिंदे कोपरी – पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले असताना
त्यांना ठाणे पूर्व विभागातील बौद्ध समाजाने बिनशर्त पाठींबा जाहीर केला. आंबेडकरी चळवळीतील युवानेते राजेश गाडे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे यांना हा पाठींबा जाहीर करण्यात आला असून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा संकल्प याप्रसंगी करण्यात आला.
कोपरी पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे यांनी सलग तीन वेळा येथून प्रतिनिधित्व केले असून यंदा मोठ्या मताधिक्याने शिंदे यांना विजयश्री प्राप्त होण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. यासोबतच शिंदे यांना ठाणे पूर्व विभागातील बौद्ध समाजाकडून बिनशर्त पाठिंब्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या कार्यक्रमात शिंदे यांनी बौद्ध समाजासाठी केलेल्या कामांचा उल्लेख करताना गाडे यांनी आपल्या समाजाची ताकद शिंदे यांच्यासोबत उभी करा, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नितीन पाटील, सामाजिक कार्यकर्ते हेमंत पमनानी, शाखाप्रमुख रोहीत गायकवाड, बौद्ध उपासक शांताराम गमरे, शाहीर सुखदेव कर्डक, नागनिका महिला मंडळ अध्यक्षा कमल तेलुरे यांच्यासह समाज बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.