Friday, May 24 2019 8:21 am

कोपरीतील बेकायदेशीर फटाका साठ्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ ‘धर्मराज्य पक्षा’चे बेलापूर येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

नवी मुंबई  : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कोपरी परिसरातील धोकादायक असलेल्या बेकायदेशीर फटाका विक्री आणि साठ्यांवर ताबडतोब बंदी आणावी या मागणीसाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने नवी मुंबईच्या बेलापूर येथील सी.जी.ओ. कॉम्प्लेक्ससमोर सोमवार, दि. १८ फेब्रुवारी-२०१९ रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारण्यात आले होते. पक्षाचे कोपरी-पाचपाखाडी विधानसभा अध्यक्ष मिलिंद कुवळेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. जनहित याचिका क्र. १५२/२०१५मधील उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संयुक्त मुख्य विस्फोटक नियंत्रक, पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा संगठन यांच्याकडून याप्रकरणी कोणतीही अंमलबजावणी होत नसून, विस्फोटक नियम २००८मधील नियम ८३, ८४, ८६ डावलून कोणतीही पाहणी न करता, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कोपरी (पूर्व) या निवासी भागात बेकायदेशीररित्या फटाके परवाने मंजूर करण्यात आले असल्याचा निषेधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आले होते.

दरम्यान, याठिकाणी मंजूर करण्यात आलेली फटाक्यांची दुकाने निवासी भागात गर्दीच्या ठिकाणी आहेत. सदर दुकानांत धार्मिक सणांच्या माध्यमातून परवाना क्षमतेपेक्षा मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा करण्यात येतो. संबंधित दुकानांचे अग्निशमन विभागाने फटाके विक्री, साठवणूक ना हरकत प्रमाणपत्र रद्द केले असता, विस्फोटक नियंत्रक यांच्याकडून परवाने मंजूर करण्यात येत आहेत. अग्निसुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नसताना संयुक्त मुख्य विस्फोटक नियंत्रक यांच्याकडून पूर्णत: दुर्लक्ष करण्यात येत असून, भविष्यात दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात याठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होऊ शकते, असे मिलिंद कुवळेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

याच पार्श्वभूमीवर, संयुक्त मुख्य विस्फोटक नियंत्रक,पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा संगठन यांच्याकडून कोणतीही कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येत नसल्यामुळे बेजबाबदार संयुक्त मुख्य विस्फोटक नियंत्रक यांच्या निषेधार्थ सोमवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी सी.जी.ओ.कॉम्पेक्सच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई येथे ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. याप्रकरणी प्रशासनाने त्वरित दखल घेऊन, सदर ठिकाणी असलेल्या धोकादायक फटाके साठे करणाऱ्या व्यावसायिकांचे परवाने रद्द करावेत, अशी आग्रही मागणी मिलिंद कुवळेकर यांनी शेवटी केली. या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाच्या आंदोलनात पक्षाच्या नरेंद्र शिंदे, मंगेश पिंगळे, संदीप सोनखेडे, शरद साळुंखे, पांडुरंग गोरे, गंगाराम शिरोडकर, गौरव गोरे, नितीन वायदंडे विष्णु तानकी या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे कोपरी-पाचपाखाडी विधानसभा अध्यक्ष यांनी आपले एकदिवसीय उपोषण पार पडल्यानंतर उप मुख्य विस्फोटक नियंत्रक, योगेश खरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले असता, खरे यांनी उपोषणाची दखल घेऊन कोपरीतील बेकायदेशीर फटाकेधारकांवर कारवाई करून त्यांचे फटाके परवाने रद्द करण्यात येतील असे लेखी अाश्वासन दिले.