Thursday, July 17 2025 6:41 pm

कोपरीतील नवरात्रोत्सवात मथुरेचा देखावा

चैत्र नवरात्रौत्सव प्रारंभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब केली पुजाअर्चा

ठाणे,१० हिंदू नववर्ष प्रारंभ होत असल्याने याचदिवशी चैत्र नवरात्र उत्सव सुरु होतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोपरीतील संत तुकाराम मैदानात धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्यावतीने होणाऱ्या चैत्र नवरात्रौत्सवात मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराच्या धर्तीवर मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. चैत्र नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब उपस्थित राहुन वेद मंत्रांच्या घोषात पुजा अर्चा केली. याप्रसंगी, मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती लता शिंदे, सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,स्नुषा वृषाली शिंदे,नातु रुद्रांश यांच्यासह माजी आमदार रविंद्र फाटक, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नरेश म्हस्के, प्रकाश कोटवानी, प्रमोद बनसोडे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. १८ एप्रिल पर्यत सलग नऊ दिवस नवकुंडलात्मक सहस्त्रचंडी महायाग होणार असुन भाविकासांठी दररोज मोफत अन्नछत्र सुरू आहे.
ठाणे पुर्वेकडील कोपरी, येथील संत तुकाराम महराज मैदानात धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी मंगलमय वातावरणात श्री अंबे मॉ चैत्र नवरात्रौत्सव साजरा केला जातो. यंदा देखील प्रधानाचार्य वेदमुर्ती रविंद्र भगवान पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सहकुटुंब उपस्थित राहुन श्रींची प्राणप्रतिष्ठा तसेच सहस्त्रचंडी याग केला. तसेच जनतेवर कृपादृष्टी ठेवुन समृद्धी आणि संतुष्टीचा आशिर्वाद महाराष्ट्राच्या मस्तकी असु दे ! सर्वाना सुख समाधान, आनंद, भरभराट व उत्तम आरोग्य लाभु दे ! असे मागणे मुख्यमंत्र्यांनी आई जगदंबेच्या चरणी मागितले. दिनांक ९ एप्रिल ते १८ एप्रिल दरम्यान देवीचा हा उत्सव साजरा करण्यात येत आहे सलग नऊ दिवस नवकुंडलात्मक सहस्त्रचंडी महायाग होणार असुन या ९ दिवसांच्या काळात पारंपारिक गोंधळ ,भारूड, शाहिरी कला, महाराष्ट्राची लोकधारा, माता की चौकी यासारख्या विविधतेने नटलेल्या तसेच मंत्रमुग्ध करणाऱ्या सांस्कृतिक, भक्तीमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुढी पाडव्याला पहिल्या दिवशी पुर्वांग प्रस्तुत चैत्र दुर्गा हा जागर स्त्री शक्तीचा गीत नजराण्याचा सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित महिलांनी मराठी, हिंदी तसेच गुजराती भाषेतील पारंपारिक गीतांवर फेर धरून आनंद लुटला.तर देवीचा आकर्षक नयनरम्य देखावा,देवीची विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांचा ओघ सुरू असतो.