ठाणे,16 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोपरीत सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सवात शनिवारी पाचव्या दिवशी सुरमयी गाण्यांची धम्माल मस्ती रसिकांनी अनुभवली. मंगलमय वातावरणात श्री अंबे मॉच्या दर्शनासाठी भाविकांची अक्षरशः रिघ लागली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ.लता एकनाथ शिंदे, स्नुषा वृषाली श्रीकांत शिंदे यांच्यासह मुख्यमंत्र्याचे वडील संभाजी शिंदे, भाऊ प्रकाश शिंदे हे जातीने उपस्थित होते. येत्या १८ एप्रिलपर्यत हा उत्सव सुरू असल्याची माहिती येथील संयोजक प्रकाश कोटवानी यांनी दिली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही कोपरीतील संत तुकाराम मैदानात धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्यावतीने मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराच्या देखाव्यात भव्य चैत्र नवरात्रौत्सव साजरा होत आहे.नऊ दिवस वेद मंत्राच्या घोषात नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग सुरु आहेत. असुन विविधतेने नटलेल्या तसेच मंत्रमुग्ध करणाऱ्या सांस्कृतिक, भक्तीमय कार्यक्रमांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. शनिवारी पाचव्या दिवशी पुर्वांग एन्टरटेंमेंट प्रस्तुत “जल्लोष – धम्माल मस्ती गाण्यांची ” हा संगीत नजराण्याचा सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात पार पडला. यावेळी, गायक शिरिष कांबळे, पल्लवी दाभोळकर, अंशिका सोंडकर आदी कलाकारांनी आपल्या बहारदार आवाजाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. जय देवा श्री गणेशा…या गीताने झालेल्या कार्यक्रमाचा समारोप आता वाजले की बारा…झिंग झिंग झिंग झिंगाट या गाण्यानी झाला. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित महिलांनी मराठी, हिंदी तसेच गुजराती भाषेतील सुमधुर गीतांवर फेर धरून गात – नाचत आनंद लुटला. दरम्यान, मथुरेच्या श्रीकृष्ण मंदिरातील देखाव्यात साकारलेले देवीची आकर्षक नयनरम्य विलोभनीय मूर्ती बघण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संखेने भाविक उपस्थित होते.भक्तगण नवस करण्याकरीता तसेच नवस फेडायलाही येतात.याठिकाणी दररोज अल्पोपहारासह दुपारी व रात्री महाभंडाऱ्याची सुविधा देखील आयोजका तर्फे करण्यात आली आहे.