ठाणे, 4 – भारत निवडणूक आयोगाने कोकण विभाग विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक जाहीर केली असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी आज जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. यावेळी निवडणूक कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, तहसीलदार श्री. ठोंबरे, राजकीय पक्षाचे पदाधिकारी सर्वश्री विलास जोशी, शिरिष घरत, नैनेश पाटणकर, संभाजी शेळके आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शिनगारे म्हणाले की, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे. या मतदारसंघासाठी जिल्ह्यात 20 मतदान केंद्रे असणार आहेत. तसेच जिल्हास्तरावर आचारसंहिता स्थायी समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीत जिल्हाधिकारी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष, माध्यम प्रमाणीकरण व देखरेख समिती व भरारी पथक स्थापन करण्यात येत आहेत. तालुकास्तरावर व्हिडीओग्राफी पथक तयार करण्यात येत असून, या पथकांमार्फत राजकीय पक्ष/लोक प्रतिनिधी यांच्या दौऱ्यादरम्यान आचारसंहितेचा भंग होणार नाही याबाबत पर्यवेक्षण करण्यात येईल. विभागीयस्तरावर चोवीस तास चालू असलेला तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
*ठाणे जिल्ह्यात 14 हजार 683 मतदार*
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी ठाणे जिल्ह्यात एकूण 14 हजार 683 शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. यामध्ये 8767 स्त्री मतदार असून 5916 पुरुष मतदारांचा समावेश आहे. तर अंतिम मतदार यादीनुसार कोकण विभागात एकूण 37 हजार 719 मतदार आहेत.
*मतदार शिक्षकांना नैमित्तिक रजा*
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुकीसाठी मतदार असलेल्या शिक्षक मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विशेष नैमित्तिक रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत नावे असलेल्या शिक्षकांना ही नैमित्तिक रजा अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे.