ठाणे, 30 : – कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीसाठी आज ठाणे जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. मतदानाची वेळ संपल्यानंतर दु. 4 वाजेपर्यंत जिल्ह्यात साधारणपणे 88.86 टक्के मतदान झाले. मतमोजणी गुरुवार दिनांक 02 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 8.00 वाजल्यापासून नवी मुंबईत सुरु होणार आहे, अशी माहिती शिक्षक मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.
कोकण विभाग शिक्षक मतदार संघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग हे पाच जिल्हे समाविष्ट आहेत. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 8 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत मतदान पार पडले. या निवडणुकीकरीता नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या शिक्षक मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. ठाणे जिल्ह्यातील एकूण 20 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. अनेक ठिकाणी मतदारांनी सकाळपासून रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला. ठाणे जिल्ह्यात एकूण 15 हजार 300 शिक्षक मतदार होते. यामध्ये 6029 पुरुष व 9271 स्त्री मतदारांचा समावेश आहे. आज झालेल्या मतदानात एकूण 13 हजार 595 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा निवडणूक कार्यालयाने केलेल्या जनजागृती व इतर उपाययोजनांमुळे शिक्षक मतदारसंघासाठी ठाणे जिल्ह्यात आज 88.86 टक्के मतदान झाले.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची मतदान प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच मतदान केंद्रांवर व्हिडीओग्राफी व वेबकास्टींगद्वारे लक्ष ठेवण्यात आले होते, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी सांगितले.
मतदान संपल्यावर मतदान अधिकारी/ कर्मचारी यांच्यामार्फत सर्व मतपेट्या पोलीस बंदोबस्तासह जिल्हा मुख्यालय येथे एकत्रित करण्यात येऊन नंतर एकत्रितपणे त्या नवी मुंबईतील आगरी कोळी संस्कृती भवन, नेरुळ (पश्चिम) येथील मतमोजणीच्या ठिकाणी स्ट्राँग रुममध्ये जमा करण्यात येत आहेत.