माध्यम पूर्वप्रमाणीकरण, मतदान जनजागृती आणि एकत्रित माध्यम कक्षाद्वारे होणारे माध्यम निरीक्षणाचे काम जबाबदारीने करावे
-विभागीय उपसंचालक डॉ.गणेश मुळे
ठाणे, दि. 01 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कोकण विभागीय उपसंचालक डॉ. गणेश व.मुळे यांनी आज ठाणे जिल्हा माहिती कार्यालयातील एकत्रित माध्यम कक्षास (Integrated Media Cell) भेट दिली.
यावेळी उपसंचालक डॉ. गणेश व.मुळे यांनी एकत्रित माध्यम कक्षातील इलेक्ट्रॉनिक मीडिया कक्षासह विविध दैनंदिन कामकाजाची पाहणी केली. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देशानुसार एकत्रित माध्यम कक्षाचे निवडणूकविषयक कामकाज जबाबदारीने करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील वरिष्ठ लिपिक अविनाश सकपाळ, सचिन काळुखे यांच्यासह माध्यम कक्षासाठी नियुक्त इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण व 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून उमेदवारांच्या प्रचार जाहिरातींचे प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही केली जाते. तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या प्रसिद्धीचे काम करण्यात येत आहे. ठाणे जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक संबंधी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी समन्वय राखून प्रसिद्धीचे कामकाज केले जात असल्याबाबतची माहिती यावेळी उपसंचालक डॉ.मुळे यांना देण्यात आली.