ठाणे,१३ : कोकणी उत्पादनांना मुंबई- ठाण्यात मोक्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार. यासाठी जी मदत लागेल ती बँकेच्या माध्यमातुन करणार असल्याचे प्रतिपादन आमदार व मुंबई बँक अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी केले. सीताराम राणे यांनी आयोजित केलेल्या कोकण ग्रामविकास मंडळाच्या २४ व्या मालवणी महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी आमदार दरेकर यांच्या हस्ते झाले.यावेळी व्यासपीठावर आमदार संजय केळकर,भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे,मा. नगसेवक संदीप लेले,सचिन मोरे, परिवहन सदस्य विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर यंदा पुन्हा पुर्वीच्याच जोषात ठाण्यातील शिवाईनगर येथील उन्नती मैदान येथे मालवणी महोत्सव होत आहे. १३ जाने. ते २२ जानेवारी या दहा दिवसांच्या भव्य मालवणी महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी आयोजक सीताराम राणे यांनी अग्निहोत्र करून केली. यावेळी उद्घाटन प्रसंगी आ.प्रविण दरेकर यांनी, ठाकरे सरकारने कोकणी माणसाचा कधीच विचार केला नसला तरी आम्ही कोकणचे सर्व आमदार कोकणच्या विकासासाठी सतत पाठपुरावा करू.तसेच, कोकणी उत्पादनाला कायम स्वरूपी बाजारपेठ मुंबई- ठाण्यात मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार. तसेच यासाठी जी मदत लागेल ती बँकेच्या माध्यमातुन करणार असल्याचे आश्वासन दरेकर यांनी दिले. अशा प्रकारच्या महोत्सवाच्या माध्यमातुन कोकणशी नाळ जोडण्याचं काम केले जात आहे. अशा प्रकारच्या महोत्सवातून छोट्या उद्योजकाना प्रोत्साहन मिळते.दरम्यान, मालवणी महोत्सवात येऊन कसा वाटला ? असा प्रश्न आ. दरेकर यांना करताच त्यांनी, ‘बरा वाटला ‘ असा मालवणी भाषेत संवाद साधुन यापेक्षा अधिक मालवणी भाषा येत नसल्याचे नमुद केले.
– मुंबई हातुन जात असल्यानेच ठाकरें वैफल्यग्रस्त
आदित्य ठाकरे यांच्या मातोश्रीकडे कंत्राटदारांची जेवढी माहिती असेल तेवढी अन्य कुणाकडे नाही. गेली २५ वर्षे टक्केवारीचा अनुभव आदित्य यांना आहे. आता गेले सहा महिने मुंबईकरांना जे हवे आहे ते शिंदे – फडणवीस सरकार देत आहे. त्यामुळेच त्यांना पोटशुळ उठला असुन मुंबई हातातुन जात असल्याने ते वैफल्यग्रस्त झाल्याची टीका आ.दरेकर यांनी केली. तर शिंदे, फडणवीस सरकार मुंबई बरोबरच ठाण्याचाही विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.