Saturday, April 20 2019 12:15 am

कोकणातून नजीब मुल्ला यांना एकगठ्ठा मतदान होणार सुनील तटकरे यांचा विश्वास

दापोली (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जीवावर विजयी होऊन मोठमोठी पदे उपभोगणार्‍यांनी  पक्षाशी गद्दारी केली आहे. पण, अशा गद्दारांना कोकणी माणूस घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. कोकणातून नजीब मुल्ला पदवीधरांची एकगठ्ठा मते मिळवून विजयी होतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
 कोकण पदवीधर निवडणूकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी उमेदवार नजीब मुल्ला यांचा कोकण दौरा सुरु झाला आहे.  दापोली आणि खेड येथे उमेदवार नजीब मुल्ला यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह जनसामान्यांनी जोरदार स्वागत केले.  यावेळी झालेल्या सभेत राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे बोलत होते. या प्रसंगी आ. संजय कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव,भाई पोस्तुरी  आदी मान्यवर उपस्थित होते.
 सुनील तटकरे पुढे म्हणाले की,  पदवीधर मतदारांची नोंदणी ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाची नोंदणी आहे.  पदवीधरांना सोबत घेऊन राष्ट्रवादीला महाराष्ट्र घडवायचा आहे. अनिकेत तटकरे यांच्या निमित्ताने दापोलीकारांनी यशाची मुहूर्तमेढ रोवली आहे. आता नजीब मुल्ला यांना विजयी करुन विजयाची हॅटट्रीक साजरी केली जाणार आहे. ठाणे पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नजीब मुल्ला यांचे  महापौरपद थोडक्यात हुकले होते. पण आता पदवीधर मतदारसंघ आपणच जिंकणार आहोत.  सबंध कोकणातून नजीब यांना एकगठ्ठा मतदान होणार असून ते मोठ्या फरकाने निवडून येतील. दापोलीकरांनी ठरवले ते होतेच आणि यावेळी नजीब मुल्ला यांना विजयी करण्याचे धोरण दापोलीकरांनी आखले आहे. त्यामुळे जिंकणारच!
स्थानिक आमदार संजय कदम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात निरंजन डावखरे यांचा चांगलाच समाचार घेतला.  राष्ट्रवादीच्या पाठीत खंजिरी खुपसणारा 5 वर्षे गायब होता; आम्ही आपला समजून डावखरे यांना निवडून दिला; मात्र, त्यांनी आपलाच घात केला.  नजीब मुल्ला यांच्या निवडणुकीची जबाबदारी  तटकरे यांनी घेतली म्हणजे त्यांचा विजय नक्की होणार आहे, असे ते म्हणाले.
जिल्हा अध्यक्ष  बाबाजीराव जाधव यांनी, गद्दारांना धडा शिकवण्यासाठी आम्ही तयार आहोत. शरद पवार यांनी उमेदवार घोषित केला आणि आम्ही कामाला लागलो. शरद पवार यांनी लढवय्या उमेदवार निवडला आहे, असे सांगितले.
 बेईमानी केलेल्या उमेदवाराला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. निवडणुकीच्या काळात दापोली कमी पडणार नाही. कार्यकर्ते कामाला लागले आहेत. नजीब मुल्ला यांचा विजय निश्चित असल्याचे भाई पोस्तुरी यांनी सांगितले  तर,  नजीब मुल्ला यांनी, राज्य आणि केंद्रातील सत्ता परिवर्तनाचे दरवाजे कोकणी माणूस उघडणार आहे. त्याची सुरुवात कोकण पदवीधर मतदारसंघापासूनच होणार आहे.  राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये काम करण्याची क्षमता आहे. सतेच्या लालसापोटी पक्ष बदलणार्‍याला धडा शिकवल्याशिवाय कोकणी माणूस गप्प बसणार नाही.