Thursday, December 5 2024 6:55 am

के.सी. कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये संपन्न झाले रस्ते सुरक्षा अग्रदूतांचे प्रशिक्षण आणि हेल्मेट वितरण

ठाणे 29 :- ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हिमांगिनी पाटील यांच्या हस्ते 400 रस्ते सुरक्षा अग्रदूतांना शपथ देण्याचा कार्यक्रम दि.25 ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. हा कार्यक्रम आवास फायनेंशियर्स लि., राजस्थान मार्ग सुरक्षा सोसायटी आणि मोटर वाहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती पाटील यांनी सर्व युवा अग्रदूतांना आवाहन केले की, परिवहन आणि पोलीस विभागासोबत मिळून ठाणे जिल्ह्यात अपघातमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी या अग्रदूतांनी आदर्श वाहन चालक बनावे. त्यांनी रस्त्यावर स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी परवान्याशिवाय वाहन चालवू नये.
श्रीमती पाटील यांनी आवास फायनेंशियर्स लि. आणि राजस्थान मार्ग सुरक्षा सोसायटी यांच्या कार्याची प्रशंसा केली. यानंतर त्यांनी सर्व उपस्थितांना रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने शपथ दिली. आवास फायनेंशियर्स लि. चे स्टेट हेड इम्तियाज़ खान आणि विशाल यांनी सर्व युवा अग्रदूतांना सुरक्षित भारतासाठी “युवा जागृत-देश जागृत, युवा सुरक्षित-देश सुरक्षित” या संकल्पनेत सामील होण्याचे आवाहन केले.
सोसायटीचे परियोजना सहसमन्वयक भरत राज गुर्जर यांनी या अभियानाच्या उद्देशांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत 85 हजार मार्ग सुरक्षा अग्रदूत बनविले गेले आहेत आणि 18 हजार हेल्मेट वितरित करण्यात आले आहेत. यावर्षी आणखी 8 हजार रस्ते सुरक्षा अग्रदूत तयार करण्याचे कार्य सुरू आहे.
राजस्थानचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी व रस्ते सुरक्षा तज्ञ डॉ. वीरेंद्र सिंह राठौड़ यांनी रस्ते सुरक्षा चक्राबद्दल माहिती दिली. त्यांनी सर्व नियम व प्रावधानांची माहिती देत, अभियंता विद्यार्थ्यांना मार्ग सुरक्षा ऑडिट आणि विविध सर्वेक्षणांमध्ये भाग घेण्याची गरज स्पष्ट केली.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरजीत यांनी रस्ते सुरक्षा अग्रदूतांना स्वच्छ, स्वस्थ आणि सुरक्षित रस्ते संस्कृती विकसित करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी रस्ते सुरक्षा प्रार्थना करुन केली.
कॉलेजचे प्राचार्य विलास सर यांनी कार्यक्रमाचे महत्व विषद करून प्रादेशिक परिवहन कार्यालय व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ठाणेच्या सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शपथ घेतल्यानंतर, सेमिनार हॉल “रस्ते सुरक्षा-जीवन रक्षा, सर सलामत तो सब सलामत” या घोषणांनी दुमदुमला.
यावेळी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि रस्ते सुरक्षा पॉकेट बुक वितरित करण्यात आले. तसेच या प्रशिक्षणार्थ्यांना हेल्मेट्सही वितरित करण्यात आले. या कार्यक्रमात संदीप पाते, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रभारी प्रा.अजय व त्यांचे सहकारी व प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.