Saturday, April 20 2019 12:10 am

केपटाऊनमधील तिसऱया व शेवटच्या लढतीत भारताचा 7 धावांनी विजयी

वृत्तसंस्था / केपटाऊन

स्टार कर्णधार विराट कोहलीच्या गैरहजेरीतही रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने तिसऱया व शेवटच्या टी-20 लढतीत दक्षिण आफ्रिकेला 7 धावांच्या निसटत्या फरकाने पराभूत केले आणि 3 सामन्यांची ही मालिका 2-1 फरकाने जिंकत या जवळपास 50 दिवसांच्या आफ्रिकन दौऱयाची सर्वोत्तम विजयी सांगता केली. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 7 बाद 172 धावा जमवल्यानंतर भारताने या लढतीत आफ्रिकेला 6 बाद 165 धावांवर रोखत विजय खेचून आणला.
विजयासाठी 173 धावांचे आव्हान असताना दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी काही वेळा भारतीय संघाच्या तोंडी फेस आणलाच होता. पण, केवळ निर्णायक क्षणी ब्रेकथ्रू मिळवण्यात व धोकादायक ठरणाऱया फलंदाजांना वेळीच लगाम घालता आल्याने भारताला येथे विजय संपादन करता आला. कर्णधार जेपी डय़ुमिनी (55) व ख्रिस्तियन जाँकर (49) सामना भारताच्या घशातून काढून घेईल की काय, अशीही धास्ती एकवेळ जरुर होती. पण, डय़ुमिनीला शार्दुल ठाकुरने तर जाँकरला भुवनेश्वरने बाद केल्यानंतर भारताच्या मार्गातील दोन मोठे अडथळे दूर सारले गेले.
दक्षिण आफ्रिकेने या लढतीत मिलरला सलामीला बढती देत अनोखी चाल रचली. पण, यात त्यांना अपेक्षित यश मात्र लाभले नाही. मिलर 24 तर हेन्डरिक्स 7 धावांवर बाद झाले. मागील लढतीत भारताला पराभवाच्या खाईत लोटणारा क्लासेन येथे पंडय़ाच्या गोलंदाजीवर भुवनेश्वरकडे झेल देत परतला. भुवनेश्वरसह जसप्रीत बुमराह (1-39) यांनी प्रारंभीच्या स्पेलमध्ये उत्तम मारा केला तर शार्दुल ठाकुरने (1-35) धावगती नियंत्रणात ठेवली. पहिल्या 6 षटकात तर त्यांना केवळ 25 धावा जमवता आल्या होत्या, ते लक्षवेधी ठरले.
गोलंदाजीची संधी मिळाल्यानंतर रैनाने मिलरला बाद केले तर पंडय़ाने क्लासेनला मिडऑफवरील भुवनेश्वरकरवी झेलबाद करणे महत्त्वाचे ठरले. अक्षर पटेल एकाच षटकात 16 धावा दिल्याने महागडा ठरला. पण, शार्दुलने डय़ुमिनी-जाँकरची चौथ्या गडय़ासाठी 39 धावांची भागीदारी फोडली व संघासाठी विजयाचे दरवाजे खुले झाले. पुढे बुमराहने ख्रिस मॉरिसला (4) त्रिफळाचीत केले. शेवटच्या 3 षटकात 53 धावांची गरज असताना जाँकरने एका षटकात 18 धावा वसूल केल्या तर 19 व्या षटकात आणखी 16 धावा फलकावर लागल्या. त्यानंतर शेवटच्या षटकात 19 धावांची गरज असताना भुवनेश्वरने भारताला हवाहवासा विजय संपादन करुन दिला आणि भारताच्या या ऐतिहासिक दौऱयाची यशस्वी सांगता झाली.

शेवटच्या षटकात काय घडले?
दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात विजयासाठी 19 धावांची गरज असताना हंगामी कर्णधार रोहित शर्माने भुवनेश्वरकडे चेंडू सोपवला आणि भुवीने देखील हा विश्वास सार्थ ठरवला. बेहार्दिनसारखा धोकादायक फलंदाज समोर असताना देखील त्याने धीरोदात्त व संयमी नियंत्रित मारा केला. या षटकातील पहिल्या चेंडूवर त्याने जाँकरला एकेरी धाव दिली. बेहार्दिनने दुसऱया चेंडूवर चौकार जरुर फटकावला. पण, तिसऱया फुलटॉसवर त्याला एकच धाव घेता आली. याचवेळी वाईडची अवांतर धाव गेल्यानंतर शेवटच्या 3 चेंडूत 12 धावा असे समीकरण होते. त्यानंतर मात्र जाँकरला पुढील दोन चेंडूवर प्रत्येकी 2 धावा घेता आल्या आणि शेवटच्या चेंडूवर 8 धावा असे अशक्यप्राय चित्र निर्माण झाले. या शेवटच्या आऊटसाईड ऑफस्टम्पवरील फुलटॉस चेंडूवर जाँकरने एक्स्ट्रा कव्हरवरील रोहित शर्माकडे झेल दिला आणि भारताच्या धमाकेदार विजयावर थाटात शिक्कामोर्तब झाले!