Saturday, August 24 2019 11:08 pm

केडीएमसी किंवा वाहतूक शाखेत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवत लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका महिलेविरोधात तक्रार दाखल

कल्याण -: केडीएमसी किंवा वाहतूक शाखेत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवत लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका महिलेविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात नलिनी उघडे (५८, रा. मिलिंदनगर) यांनी गुरुवारी तक्रार दाखल केली. पोलिसांनी किरण दिलीप फुंदे हिच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
नलिनी यांच्या मुलाला केडीएमसी किंवा वाहतूक शाखेत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे प्रलोभन त्यांच्या ओळखीतील फुंदे हिने २०१२ मध्ये त्यांना दाखवले होते. नलिनी यांनी टप्प्याटप्प्याने फुंदे हिला एक लाख १० हजार रुपये रोखीने दिले होते. तसेच, नलिनी यांच्या भावानेही एक लाख ३० हजार रुपये दिले होते. त्यानंतर, वेळोवेळी फुंदे हिच्याकडे मुलाच्या नोकरीबाबत नलिनी चौकशी करत होत्या. परंतु, ती त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत होता. नलिनी यांचा तगादा पाहून तिने केडीएमसीमध्ये जागा नसून वाहतूक शाखेत नोकरी लावण्याची बतावणी करत त्यांच्याकडून वेळ वाढवून मागत होती. मात्र, त्यानंतरही काम होत नसल्याने नलिनी यांनी फुंदे हिच्याकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. तेव्हा फुंदे हिने दमदाटी करत माझा मेहुणा पोलीस खात्यात असल्याचे सांगत जर पैसे मागितले तर, मी स्वत:ला जाळून घेऊन त्यात अडकवण्याची तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याचे नलिनी यांनी तक्रारीत म्हटले आहे.