Friday, May 24 2019 8:21 am

केडीएमसीच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक ?

कल्याण : २०१५ मधील महापालिका निवडणुकीनंतर भाजपाला दोन वर्षे, तर शिवसेनेला तीन वर्षे स्थायी समितीचे सभापतीपद दिले जाईल, असा अलिखित करार शिवसेना-भाजपामध्ये झाला होता. पहिल्या वर्षी भाजपाचे संदीप गायकर, त्यानंतर शिवसेनेचे रमेश म्हात्रे, तर तिसऱ्या वर्षी भाजपाचे राहुल दामले यांना स्थायी समिती सभापतीपद दिले गेले. आता पुन्हा शिवसेनेकडून सभापतीपदावर दावा केला जात आहे.
केडीएमसीच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होणे अपेक्षित आहे. सभापतीपदाची धुरा कोणाकडे सोपवायची, याचा निर्णय शिवसेनेतील पक्षश्रेष्ठी घेणार आहेत.
सभापतीपद पुन्हा डोंबिवली की कल्याण पश्चिमेकडे जाणार? तसे झाल्यास कल्याण पूर्वेवर अन्याय होणार का? असे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लढवले जात आहेत. या वेळेस कल्याण पूर्वेला न्याय मिळावा, अशी अपेक्षा तेथील नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.
कल्याण पूर्वेतील निलेश शिंदे व महेश गायकवाड हे सदस्य या पदासाठी इच्छुक आहेत. कल्याण पूर्वेतील ज्येष्ठ नगरसेवक मल्लेश शेट्टी यांना स्थायी समिती सदस्यपद न दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे कल्याण पश्चिमेतील नगरसेवक जयवंत भोईर आणि गणेश कोट यांचीही नावे सभापतीपदासाठी चर्चेत आहे