नवी दिल्ली 07 – केंद्र सरकारने गृहनिर्माण व नागरी व्यवहार समितीच्या स्थायी समिती सदस्य पदी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांची नेमणूक केली आहे.
देशाच्या शहरी योजनांमध्ये योगदान देण्याची संधी मला मिळाली ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असल्याची भावना खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लोकसभेतील शिवसेना गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत.
समितीत देशातील शहरी योजना उदा. मेट्रो, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत योजना, पंतप्रधान आवास योजना, अमृत योजना, परिवहन अशा विविध अर्थसंकल्प आणि शहरी विकास योजनांवर चर्चा करून निर्णय घेतले जातात.
समितीची पहिली बैठक समितीचे अध्यक्ष श्री. मागुंता श्रीनिवासुलु रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीच्या संसद भवनात झाली. यावेळी शहरी वाहतुकीच्या समस्यांवर खासदार नरेश म्हस्के यांना मत मांडण्याची संधी मिळाली.
महापालिकांना सध्या होत असलेल्या आर्थिक तोट्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कमकुवत होत चालली आहे. कोविड काळात महानगरपालिकांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. शहरी वाहतुकीच्या अनुषंगाने पंतप्रधानांनी दिलेल्या इलेक्ट्रिक बसेससाठी अधिक अनुदान वाढवण्याची गरज आहे, असं मत खासदार नरेश म्हस्के यांनी मांडले.
शहरी वाहतुकीप्रमाणेच स्मार्ट सिटी योजनेमध्ये सुरू असलेल्या कामांची देखील केंद्र सरकारने योग्य तपासणी करण गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी या योजनांमध्ये थेट सहभाग घेतला पाहिजे. अशा प्रकल्पांमध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग असणे, निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग असणं गरजेचं असल्याचे, खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
भारतातील नागरी नियोजनाला अधिक परिणामकारक बनवण्यासाठी उत्कृष्ट केंद्रे विकसित करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करणं गरजेचे आहे. ज्यामुळे अशा केंद्रांद्वारे शहरी नियोजन, संशोधन, आणि शिक्षण याला चालना देऊन, शहरांचं दीर्घकालीन आणि शाश्वत विकासाचं उद्दिष्ट साध्य होईल. शहरी भागात जमीन सुधारणांच्या अंमलबजावणीचा आढावा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकासाचं नवीन पर्व उलगडण्यासाठी राष्ट्रीय शहरी डिजिटल मिशन (NUDM)चे पुनरावलोकन व अंमलबजावणी करावी, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी समितीला केली.