Monday, October 26 2020 4:10 pm

कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोष, राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन

मुंबई : राज्यसभेत कृषीसंबंधी विधेयकं मंजूर झाली असून शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. पंजाबमध्ये युथ काँग्रेसच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी पंजाब-हरियाणा सीमेवर अंबाला – मोहाली महामार्गावर उभारलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर बळाचा तसंच पाण्याचा मारा करत रोखण्याचा प्रयत्न केला. विधेयकं लोकसभेत मांडण्यात आली आहेत तेव्हापासून पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी त्याचा विरोध करताना दिसत आहेत.

शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारण्याचा इशारा दिल्यापासूनच हरियाणा सरकारने सुरक्षेत वाढ केली होती. शेतकऱ्यांनी दुपारी १२ ते ३ दरम्यान हायवे अडवण्याचा इशारा दिला होता. शेजारी राज्यांमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्येही अलर्ट देण्यात आला होता.

आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते. अनेकजण ट्रॅक्टर घेऊन आले होते. यावेळी विधेयकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जवळपास तीन तास आंदोलन सुरु होतं. राज्यातील तसंच राष्ट्रीय महामार्गावरील नाकाबंदी उठवण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.

हे दोन्ही कायदे ऐतिहासिक असून, शेतकऱ्यांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवून आणतील. शेतकरी त्यांचा शेतमाल देशभरात कुठेही मुक्तपणे विकू शकतील. मी शेतकऱ्यांना आश्वासित करतो की ही विधेयके एमएसपीशी संबधित नाहीत, असं तोमर यांनी विधेयक मांडताना सांगितलं.