ठाणे,२२ ः निवृत्तीनंतरही म्हातारे होऊ नका, कुटुंबाला हातभार म्हणून काही तरी काम करीत राहा, असे आवाहन चित्रपटसृष्टीत गेली ४८ वर्षे अंग्री यंग मॅन अर्थात बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे रंगभूषाकार म्हणून कार्यरत असलेले दीपक सावंत यांनी केले.
ठाणे पूर्वेतील सुयश कला -क्रीडा मंडळाच्यावतीने आयोजित व्याख्यानामालेचे दुसरे पुष्प शनिवारी दीपक सावंत यांच्या मुलाखतीने गुंफण्यात आले. मयुरेश साने यांनी त्यांना बोलते केले. यावेळी सुयश मंडळाचे सुरेश तिवटणे, मधुसूदन राव, सतीश सावंत तसेच, ज्येष्ठ नेते गोपाळ लाडंगे, केदार दिघे उपस्थित होते.
आपल्या मेकअपमनच्या कारकिर्दीचा प्रवास दीपक सावंत यांनी उलगडला. घरची परिस्थिती अंत्यत गरिबीची असल्याने ३० रूपये ते १५० रुपये पगाराची नोकरी केली, पण खर्च भागत नव्हता. मात्र,नोकरीत प्रामाणिक असल्याने एकेक दालन खुले होत गेले. वडीलही मेकअपमन असल्याने, त्यांना मी या क्षेत्रात येऊ नये, असे वाटत असे. पण, एका चित्रीकरणा दरम्यान राजेश खन्ना यांना आरसा दाखविण्याचे काम मिळाले, त्यानंतर अचानक बी. आर. फिल्ममधून कामाचे बोलावणे आले. तिथे दिलीपकुमार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर, राज खोसला यांच्या ‘रास्ते का पत्थर’ या चित्रपटासाठी काम करणारे मेकअपमन न आल्याने त्या दिवशी चक्क अमिताभ बच्चन यांचा मेकअप करण्याची संधी मिळाली.त्या संधीचे सोने करून आज ‘बीग बींचे मेकअपमन अशी बिरुदावली गेली ४८ वर्षे मिरवण्याचे सौभाग्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले. चित्रिकरणात अमिताभ बच्चन यांचे संवाद वाचुन त्या संवादातील भावनांनुसार अमिताभजींना मेकअप करतो. आई आणि बहीणीचे निधन झाले होते, तेव्हाही, मेकअपचे काम पूर्ण करूनच आईवर अंत्यंसंस्कार केले. तसेच,बहीण मानलेली कलात्मक अभिनेत्री स्मिता पाटील हिच्या अंतिम विदाईच्या वेळेस जड अंतःकरणाने तिला ‘सवाष्ण’ मेकअप केला. अशा हृदयस्पर्शी आठवणीही त्यांनी जागवल्या. केशभुषा, वेषभुषा आणि अभिनय यासोबत मेकअपमुळेच कलाकाराला ‘पात्र’ उभे करता येते. असे त्यांनी स्पष्ट केले. हिंदी, मराठी बरोबरच भोजपुरी चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली. मात्र, मराठी चित्रपट निर्मितीला ६ महिने लागतात आणि प्रदर्शित होण्यासाठी ६ महिने लागतात.अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आपल्याकडे विभक्त कुटुंब पध्दतीमुळे वृध्दाश्रमात वाढ होत असल्याची चिंता व्यक्त करून निवृत्तीनंतरही म्हातारे होवू नका, तर आपल्या कुटुंबाला हातभार म्हणून काही ना काही काम करीत राहा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आपल्या सद्गती फाऊडेंशनच्या कार्याची माहितीही त्यांनी श्रोत्यांना दिली.
मेकअपमुळे होते चेहर्याचे संरक्षण
मेकअप ही कला एका माणसांचे दुसऱ्या माणसात रूपांतर करते. मेकअपमुळे चेहऱ्याचे संरक्षण होते, आपल्याकडे धुळ, शरीरातील उष्णता व बाहरेची उष्णता याचा परिणाम चेहऱ्याच्या नाजूक त्वचेवर होतो. केवळ पाण्याने धुवून चेहरा स्वच्छ होत नाही, चेहरा धुतल्यावर पुसताना रगडु नये तर हलक्या हाताने कपड्याच्या साह्याने टिपावा. अन्यथा,अवेळी चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. अशा मौलिक टिप्स दीपक सावंत यांनी दिल्या.