मुंबई 21 -नांदेड जिल्ह्यातील किनवट हा आदिवासी बहुल तालुका आहे. येथील स्वतंत्र स्त्री रूग्णालय तसेच गोकुंदा उपजिल्हा रूग्णालयाच्या श्रेणीवर्धनाच्या प्रस्तावास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य राजेश राठोड यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.
डॉ.सावंत म्हणाले, गोकुंदा हे गाव किनवट पासून चार किमी अंतरावर आहे. येथील उपजिल्हा रूग्णालयाचे 100 खाटांच्या रूग्णालयात श्रेणीवर्धन करण्यासाठी लोकसंख्येचा असणारा निकष पूर्ण होत नसल्याने हा प्रस्ताव अमान्य करण्यात आला आहे. तथापि किनवट हा दुर्गम, आदिवासी भाग असल्याने येथे स्वतंत्र स्त्री रूग्णालय तसेच गोकुंदा येथील उपजिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याबाबत बैठक घेऊन विशेष बाब म्हणून मान्यता देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. राज्यात आवश्यक असणारी डॉक्टर आणि नर्सेसची पदे लवकरच भरली जातील, असेही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
सदस्य सर्वश्री भाई जगताप, प्रवीण दरेकर, श्रीमती प्रज्ञा सातव यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.