Sunday, July 5 2020 8:46 am

कांदा विक्रीच्या व्यवसायाचे प्रलोभन दाखवून कोट्यवधीचा गंडा

ठाणे,ता.21( प्रतिनिधी) :स्वस्त दरात कांदा खरेदी करून,दरवाढ झाल्यावर बक्कळ नफा कमावण्याचे प्रलोभन दाखवीत कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या कार्गो मेनेजरसह त्याच्या साथीदारावर नौपाडा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हरिष कारवा असे मेनेजरचे तर योगेश शाह असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे.या दुकलीने कांदा व्यवसायाच्या प्रलोभनाने तब्बल 2 कोटी 26 लाख 27 हजार रुपयांची फसवणूक करून धूम ठोकली.

 हिरानंदानी मेडोज येथे राहणारे अशोक चौधरी हे पाचपाखाडी,रवी इंडस्ट्रीयलमधील में.सोनू कार्गो मुव्हर्सचे संचालक आहेत.त्यांच्या कंपनीत हरिष कारवा हे जनरल मेनेजर आहेत.याच कारवा याने कंपनीची दिशाभूल करीत साथीदार शाह याच्या मदतीने स्वस्त दरात कांदा खरेदी करून भाव वाढेल तेव्हा विक्री करून नफा कमावण्याचे प्रलोभन चौधरी यांना दाखवले.त्यानुसार,मध्यप्रदेश सरकारकडील कांदा लिलावाद्वारे खरेदी करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने शाह याला में.सनशाईन लॉजिस्टिक या नावाने व्यवसाय करण्याची मुभा दिली होती.त्यानंतर,12 जुलै 2017 रोजी मध्यप्रदेश राज्यातील देवास येथे आरटीजीएसद्वारे कोट्यवधीची रक्कम अदा करून शेकडो टन कांदा खरेदी केला.मात्र,मागवलेला हा कांदा सडलेला असल्याचे भासवून कांद्याची परस्पर विक्री करून रक्कमेचा अपहार केला.त्यानुसार,चौधरी यांच्या तक्रारीवरून नौपाडा पोलिसात कारवा आणि शाह या दुकलीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून सहा.पोलीस निरीक्षक व्ही.आर. बनकर अधिक तपास करीत आहेत.