Tuesday, July 23 2019 10:19 am

काँग्रेसच्या दहापैकी तीन बंडखोर आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

पणजी : गोव्यातील काँग्रेसच्या दहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे  मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार  करून काँग्रेसमधून आलेल्या दहापैकी तीन आमदारांना आज मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ माजी विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांना  देण्यात आली आहे तर  काँग्रेसचे बंडखोर आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, फिलिप नेरी, जेनिफर मोन्सेरात यांच्यासह माजी विधानसभा उपाध्यक्ष मायकल लोबो यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आज सायंकाळी उशिरापर्यंत या मंत्र्यांचं खातं वाटप केलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या दहाही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने गोव्यातील भाजप सरकार मजबूत झालं असून विरोधकांचं संख्याबळ घटलं आहे. गोवाविधानसभेची एकूण सदस्य संख्या ४० इतकी आहे. गोव्यात काँग्रेसचे १७ आमदार होते. त्यातील दहा आमदार फुटल्याने आता ही संख्या ७ एवढीच राहिली आहे. तर भाजपचं संख्याबळ १७ वरून २७ वर पोहोचलं आहे.