Sunday, September 15 2019 11:45 am

कळव्यात गटाराच्या पाण्यावर पिकवला जातो भाजीपाला

ठाणे ;-  काळवा रेल्वे रूळालगत असलेल्या  गटाराच्या पाण्यावर भाजीपाला पिकवला जात असल्याचे उघडकीस आले आहे. मध्य रेल्वेनी रुळांलगत गटाराच्या पाण्यावर पिकणाऱ्या भाजी प्रकरणाची दखल घेऊन उच्च न्यायालयाने कठोर आदेश दिले असतानाही असे प्रकार समोर येत आहेत.
मलमूत्राच्या पाण्यावर भाजी पिकवली जात असल्यामुले भाजी खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्यावर वाईट परिमाण होऊ शकतो.

कळव्यातील  मध्य रेल्वेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना भाजीपाला लागवडीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही भाजी पिकवण्यासाठी लागणारे पाणी खाडी किंवा नदीचे नसून त्यासाठी नाल्यातील गटाराचे पाणी वापरले जात होते. हा प्रकार या कार्यकर्त्यांनी समोर आणला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल झाल्यानंतर हा प्रश्नावर कडक निर्देश देण्यात आले होते. त्यानंतरही गलिच्छ पाण्यावरील भाजीपाला लागवड सुरू असून कळव्यामध्ये तर एका सार्वजनिक शौचालयातून निघणारे पाणी एका खड्ड्यामध्ये एकत्र करून त्यानंतर ते पाणी मोटरद्वारे भाज्यांना दिले जाते. यातून माठ, मुळे, मेथी, कोबी, फ्लॉवरसह अन्य भाज्यांची लागवड केली जात आहे. या भाजीसाठी वापरले जाणाऱ्या पाण्यामध्ये अनेक घातक विषाणू आणि जिवाणूही आढळून आले आहे. हे मानवी शरिरामध्ये थेट गेल्यास त्याचा मोठा त्रास मानवी आरोग्यावर होणार असल्याचे सांगण्यासाठी विशेष तज्ज्ञाचीही गरज नसल्याचा दावा या मंडळींकडून करण्यात आला आहे.
रेल्वेच्या या घातक भाजीचा प्रश्न किती ज्वलंत आहे हे अधिकाऱ्यांना कळवण्याची गरज आहे. त्यांनी याकडे पुढील दिवसांमध्ये लक्ष न दिल्यास त्यांना भाजी पार्सलने पाठवण्याचे आंदोलन छेडण्याची भूमिका घेण्यात आली आहे. राकेश पेडणेकर, सुशांत सूर्यराव, संजोक शिळकर, मोहन चौहान यांनी हे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. रेल्वेच्या हद्दीतील या पाण्यामुळे भाजी खाणाऱ्यांच्या शरीरावर स्लो पॉइझनप्रमाणे परिणाम होण्याची भीती मनसेचे जनहित कक्षाचे पदाधिकारी राकेश पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे.