Tuesday, January 19 2021 10:49 pm

कल्याण ग्रामीणचे महायुतीचे पदाधिकारी आमदार सुभाष भोईर यांच्या पाठीशी 

डोंबिवली – कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांना शिवसेना पक्षाने दिलेला एबी फॉर्म अधिकृत असून पक्षप्रमुखांचा आदेश अंतिम मानून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुभाष भोईर यांच्या समर्थनार्थ कार्यालयात प्रचंड गर्दी केली. दोन दिवसांपासून प्रसारमाध्यमातून व सोशल मिडियाच्या माध्यमातून वेग वेगळ्या बातम्या प्रसारित होत होत्या त्याचे खंडन करण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी आमदार सुभाष भोईर यांची एबी फॉर्म देवून अधिकृत उमेदवारी जाहीर केली असल्याचे स्पष्ट केले. आणि पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम मानून आमदार सुभाष भोईर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून एक लाखाहून अधिकचे मताधिक्य महायुतीचे उमेदवार सुभाष भोईर यांना मिळवून देणार असल्याचे सांगितले.

शिवसेना – भाजपा – रिपाई महायुतीच्या वतीने सुभाष भोईर यांच्या उमेदवारीवर एबी फॉर्मद्वारे शिक्कामोर्तब झाले असून अंतिम उमेदवार कोण असेल हे उद्या स्पष्ट होईलअसे स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी सांगितले. शिवसैनिक हा नेहमी पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे साहेबांच्या आदेशाचे पालन करीत असतो आणि सुभाष भोईर यांना उमेदवारी मिळाल्याने महायुतीचे सर्वच पदाधिकारी नेटाने काम करतील असे त्यांनी स्पष्ट केले. तर रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी गत पाच वर्षात आमदार सुभाष भोईर यांनी जनहिताची अनेक कामे केल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवून पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म दिला असल्याने त्यांच्या समर्थनार्थ महायुतीचे सर्वच कार्यकर्ते पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास व्यक्त केला. भाजपाच्या कल्याण डोंबिवली महापालिका महिला बाल कल्याण सभापती रेखा चौधरी यांनी युतीचा धर्म पाळण्यासाठी उपस्थित राहिली असून भाजपा सुभाष भोईर यांना संपूर्ण पाठींबा देईल असे स्पष्ट केले.          या पत्रकार परिषदेस कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक ब्रम्हाशेठ पाटील, सभापती अमर ब्रम्हा पाटील, रेखा राजन चौधरी, दिपाली पाटील, नगरसेवक शैलेश पाटील, नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे, रुपाली रवि म्हात्रे, भाजपा नगरसेविका सुनिता खंडागळे, गणेश भाने, रिपाईचे डोंबिवली शहर प्रमुख अंकुश गायकवाड, जिल्हापरिषद सदस्य रमेश पाटील, युवा सेना विधानसभा आधिकारी योगेश म्हात्रे, महिला विधानसभा संघटक कविता गावंड, उपतालुका प्रमुख भगवान पाटील, सुखदेव पाटील, उपतालुका संघटक रवि म्हात्रे, किशोर रसाळ, माजी नगरसेवक पंढरी पाटील, सारिका चव्हाण, माजी कृऊबा समिती सभापती अरुण पाटील, भाजपा ठाणे जिल्हा सचिव गणेश भगत, संघातील विभागप्रमुख , उपविभाग प्रमुख, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व युवासेनेचे असंख्य कार्यकर्ते आणि महिला आघाडी उपस्थित होते.