Friday, December 13 2024 10:16 am

कल्याणकारी योजना काँग्रेस आघाडी बंद करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

करमाळा, बार्शी, धाराशीवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या झंझावाती प्रचार सभा

करमाळा, 10 काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यास कल्याणकारी योजनांची चौकशी लावून त्या बंद करतील, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सोलापूर दौऱ्यावर आज मुख्यमंत्र्यांच्या करमाळा, बार्शी आणि धाराशीवमधील, परंडा आणि कळंबा येथे झंझावाती प्रचार सभा पार पडल्या त्यात ते बोलत होते.

ते म्हणाले की, महायुतीने लाडक्या बहिणींसाठी २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिले आहे. लाडकी बहिण योजनेविरोधात काँग्रेसवाले कोर्टात गेले होते, कोर्टाने त्यांना चपराक लगावली. सत्तेत आले तर योजना बंद करणार अशी भाषा विरोधक करत आहेत, अशा सावत्र भावांना येत्या निवडणुकीत लाडक्या बहिणींनी जोडा दाखवावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. राज्यातील प्रत्येक नागरिकाला अन्न, वस्त्र निवारा देण्याचे काम आपले सरकार करणार आहे. ज्येष्ठांना २१०० रुपये पेन्शन, शेतकऱ्यांना कर्जमाफी केली, शेतकरी सन्मान योजनेत वर्षाला १५००० रुपये देणार, शहराप्रमाणे गावांचा देखील विकास होण्यासाठी ४५ हजार पांदण रस्ते बांधण्याचे वचन आम्ही दिले आहे, अंगणवाडी आणि आशा सेविकांना १५००० रुपये वेतन देणार आहोत, असे ते म्हणाले.

महायुतीचे सरकार देणारे नाही तर हप्ते भरणारे आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच महिन्यांचे हप्ते भरले. मात्र महाविकास आघाडीवाले या योजनांची चौकशी करण्याच्या धमक्या देतात. कार्यकर्त्यांच्या पुढे उभं राहून आंदोलन केलं. संघर्ष, आंदोलनं करुन आणि जेल भोगून इथपर्यंत आलोय, तुमच्यासारखा घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केला.

करमाळा येथे महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल, परांडा येथे तानाजी सावंत यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेतली. ते म्हणाले की दिग्विजयच्या नावातच विजय आहे त्यामुळे अर्धे काम झाले आहे. ते पुढे म्हणाले की, पूर्वी मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थानी मोजक्या लोकांना प्रवेश होता, आम्ही ते सर्वसामान्यांसाठी खुले केले. वर्षाचे दरवाजे सर्वसामान्य जनतेसाठी २४ तास खुले केले. कारण मी चीफ मिनिस्टर नाही तर काँमन मॅन म्हणून काम करतो. लोकांमध्ये जाऊन काम करणारा सीएम हवा घरात बसून फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री जनतेला नकोय, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उबाठाला लगावला.

महायुती उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारार्थ बार्शीमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी उबाठावर सडकून टीका केली. काहीजण म्हणतात पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरला म्हणतात, चोरायला काय खेळणं आहे काय आणि तुम्ही काय झोपा काढत होता का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवण्याचे काम आम्ही केले, असे मुख्यमंत्री म्हणाले. महायुती उमेदवार अजित पिंगळे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी कळंबा येथे सभा घेतली. धाराशीवमध्ये पाण्यासाठी ३५० कोटी आणि रस्त्यांसाठी १५० कोटी सरकारने दिले. आमदार कोणत्याही पक्षाचा असो पण जनता आमची आहे म्हणून इथं भरपूर निधी दिला, असे ते म्हणाले.