ठाणे, १३ : संगीत हा महासागर आहे, या महासागरात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सारख्या दिग्गजांची गाणी ऐकतांना आपण किती लहान आहोत, हे कळते,गाण गातांना त्यातील वास्तविकता कळत जाते, त्यामुळे कलाकार शिकत – शिकत कलेप्रती नम्र असतो, मी माझ्या कलेप्रती आयुष्यभर प्रामाणिक आहे, आणि अखेरपर्यंत प्रामाणिकच राहणार, अशी ग्वाही प्रसिध्द गायक राहुल देशपांडे यांनी दिली.
37 व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुरुवारी सरस्वती शाळेच्या पटांगणात सुप्रसिद्ध गायक, संगीतकार राहुल देशपांडे यांच्या मुलाखतीने गुंफले. प्रा.डॉ. कीर्ती आगाशे यांनी त्यांची मुलाखत घेतली. व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी भेटवस्तू आणि तिळगुळ देवून देशपांडे यांचा सत्कार केला. लहानपणी मला संगीताची फारशी आवड नव्हती, या क्षेत्रात करियर करेन याचा कधीच विचार केला नव्हता, हे देशपांडे प्रांजळपणे नमूद केले.मात्र तबल्याची आवड होती, आजोबांचे शास्त्रीय संगीताचे स्वर नेहमीच कानावर पडत होतेच. अशातच गुरुस्थानी असणारे पं. कुमार गंधर्व यांच्या अधूनमधून घरी येण्यामुळे कळतं नकळतपणे संगीताची ओढ निर्माण झाली, हाच धागा आजोबांनी ओळखला, असे ते म्हणाले. शास्त्रीय संगीताचा पाया पं. पिंपळकरबुवांनी पक्का केला. वघड गाणी गात असताना, आजोबांची गाणी फारशी जमत नव्हती. त्यामुळे आजोबांची गाणी जमेल तशी गायचो.आजोबांचे गाणं गाऊन दाखव तुला 50 रुपये बक्षीस देतो अशी पैज देखील वडिलांनी लावली, त्यानंतर पुढे 12 वर्षे आजोबांच्या फोटो समोर बसून, त्यांच्या गाण्यांचा अभ्यास केल्याचे त्यांनी सांगितले. पं. वसंतराव देशपांडे, पं मुकुल देव, पं. भीमसेन जोशी अशा दिग्गज गायकांनी गायलेल्या गाण्याचा अभ्यास करून माझा गाण्यांचा अभ्यास सुरू झाला. परंतु या सर्वांबरोबर माझी तुलना करणे चुकीचे आहे. प्रत्येक व्यक्ती ही शिकत पुढे येते,आणि एका ठिकाणी येऊन स्वतःची ओळख निर्माण करते.कुणीच कुणासारखे गाऊ शकत नाही, त्यामुळे माझी तुलना कोणाशी करू नका असे नम्र आवाहन देशपांडे यांनी केले. भावसंगीत सादर करतांना त्यात अभिनय आलाच पाहिजे, तरच गाणं रसिकांपर्यंत पोहचते.यासाठी प्रत्येक गायकाने संगीत नाटकात काम केले पाहिजे,असे मत देशपांडे यांनी मांडले. कोरोना काळात केलेल्या संगीतात राबविलेल्या प्लग्ड आणि अन प्लग्ड उपक्रमाचे अनुभव त्यांनी सांगितला. पु.ल. देशपांडे म्हणजे आमचे भाईकाका घरासमोर रहायचे, त्यामुळे घरोबा होता.प्रत्येक टप्प्यावर त्यांचे मार्गदर्शन होते. सीए चे शिक्षण घेत असताना, भाईकाका म्हणाले वकील, डॉक्टर सीए, आर्किटेक अशा अनेज पाट्या दिसतील, परंतु गायक ही पाटी दिसणार नाही. घरात संगीत असताना तू इतरत्र का भटकतो आहेस. त्यांचा बोलण्याचा कल काय आहे हे समजून गेलो आणि गाण्याला वाहून घेतले, अशी आठवण राहुल देशपांडे यांनी सांगितली. कोरोना काळात केलेल्या प्लग्ड आणि अन प्लग्ड उपक्रमाचे अनुभव त्यांनी सांगितला. माझ्या आजोबांनी आयुष्यावर आणि गाण्यावर प्रेम केले, आजोबांचे संगीतातील काम रसिकांपर्यंत पोहचवण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.रसिकांना दर्जेदार दिले, कलाकृती चांगल्या पध्दतीने सादर केली तर रसिक ती कलाकृती डोक्यावर घेतात, मला संगीत नाटकांच्या निर्मितात हाच अनुभव आला, त्यामुळे मला एकाही नाटकासाठी अनुदान घ्यावे लागले नाही, असे देशपांडे यांनी सांगितले. —