Wednesday, October 23 2019 5:07 am

कर्नाटकातील बंडखोर आमदांरांना सुप्रीम कोर्टाचे निर्देश

नवी दिल्ली :  सुप्रीम कोर्टाने  कर्नाटकातील बंडखोर आमदांरांना  विधानसभा अध्यक्षांकडे आधी आपली बाजू मांडा, असे निर्देश दिले आहेत. या आदेशानंतर आज सायंकाळी सहा वाजता हे आमदार विधानसभा अध्यक्षांना भेटणार आहेत. तत्पूर्वी आज दुपारी दोनच्या सुमारास हे सर्व आमदार पोलीस सुरक्षेत मुंबईहून बंगळुरुला रवाना होणार आहेत. मुकुल रोहतगी यांनी  सुप्रीम कोर्टात बंडखोर आमदारांच्या वतीने बाजू मांडली असून त्यांनी स्थिती निराशाजनक असून 15 आमदारांचे राजीनामे आले असताना विधानसभा अध्यक्ष निर्णय लांबणीवर टाकत आहेत. आपले कर्तव्य अध्यक्ष बजावत नाहीत, असे रोहतगी यांनी सांगितले. उलट त्या आमदारांचे राजीनामे अयोग्य घोषित करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्षांवर नियमांची पायमल्ली केल्याच्या आरोप रोहतगी यांनी केला. यावर सुनावणी करताना मुख्य न्यायाधीशांनी आमदारांना पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे जाण्यास सांगितले. अध्यक्षांनी जर आमदारांचे ऐकून घेतले नाही तर उद्या सुप्रीम कोर्ट निर्णय देईल, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले.
आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे जात आपल्या राजीमान्याची माहिती द्यावी. विधानसभा अध्यक्षांनी आमदारांची बाजू ऐकून घ्यावी आणि निर्णय घ्यावा, असे निर्देश सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिले. यानंतर मुकुल रोहतगी यांनी आमदारांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. यावर कोर्टाने आमदार एअरपोर्टवरून विधानसभा अध्यक्षांपर्यंत पोहोचेपर्यंत कडक सुरक्षा पुरविण्याचे निर्देश कर्नाटकच्या डीजीपींना दिले. कोर्टाच्या या निर्णयानंतर मुंबईतील हॉटेलमध्ये थांबलेले सर्व आमदार आज सायंकाळी सहा वाजता विधानसभा अध्यक्षांना भेटण्यासाठी बंगळुरूला पोहोचतील. आतापर्यंत 16 आमदारांनी राजीनामे दिल्याने कुमारस्वामी सरकार कोसळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.  बंडखोर आमदार आपले राजीनामे मागे घेण्यास तयार नाहीत तर दुसरीकडे कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी चुकीच्या पद्धतीने राजीनामे दिल्याचे सांगत आठ आमदारांचे राजीनामे नामंजूर केले होते.