Tuesday, June 2 2020 3:58 am

कर्णबधीर मुलांवरील शस्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळेत संजीव जयस्वाल यांचे भावपूर्ण;उद्गार नेपाळसह देशभरातील ईएनटी सर्जनचा सहभाग

ठाणे : काकलेहर सर्जरीसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून केवळ आर्थिक मदत दिली जात नाही तर मानवतेच्यादृष्टीकोनातून केलेली ही सर्वात मोठी सेवा आहे. पण आम्ही स्वीकारलेला मानवतेचा हा मार्ग संपूर्ण देशभर सर्वदूर पसरूदे आणि कर्णबधीर मुलांचे विश्व उजळून निघूदे असे भावनिक उद्गार ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी काढले.

कर्णबधीर मुलांवर कॉकलियर शस्त्रक्रिया जास्त प्रमाणात व्हावी, यामध्ये जास्तीत जास्त तज्ज्ञ डॉक्टर निष्णात व्हावेत यासाठी डॉ. प्रदीप उपल यांनी ज्यूपिटर हाॅस्पीटल येथे देशभरातील विविध तज्ज्ञ डॉक्टरांसाठी ही शस्त्रक्रिया कशी करावी यासाठी राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत सहभागी डॉक्टरांचा श्री. जयस्वाल यांच्याहस्ते प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना श्री. जयस्वाल यांनी काकलेहर इम्प्लांट शस्त्रक्रियेविषयी बोलताना म्हणाले की, ठाणे महापालिका ही देशातील एकमेव महापालिका आहे की ती अशा प्रकारच्या उपक्रमांना मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करते आहे. पण या उपक्रमाची अंमलबजावणी सर्व देशभर व्हायला हवी. डॉ. उपल यांच्यासारखे डॉक्टर तयार व्हायला हवेत. तसे झाले तर कर्णबधीर मुलांच्या आयुष्यामध्ये नवी पहाट उजाडेल असे सांगितले. यावेळी त्यांनी डॉ. प्रदीप उपल, त्यांच्या पत्नी डॉ. उमा उपल, ज्यूपिटर हॉस्पीटलचे डॉ. अंकित ठाकूर या सर्वांचे मनापासून आभार मानले.

देशभरात कॉकलियर इम्प्लांट सर्जरी करणारे डॉक्टर केवळ एक टक्केच आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे १२० च्यावर सर्जरी या डॉ. उपल यांनी केल्या आहेत. परंतू ही चळवळ पुढे चालू राहावी यासाठी डॉ. उपल यांनी ही शस्त्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

या कार्यशाळेमध्ये नेपाळसह उत्तर प्रदेश, दिल्ली, चंदीगड, हैद्राबाद, बेंगलोर, कोचीन या प्रदेशातून निवडक १० सर्जन सहभागी झाले होते. या सर्वांना डॉ. उपल यांनी कानाची थ्री डी प्रतिकृती तयार करून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण दिले.