मुंबई, 03 : कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथील क्रांतिवीर महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यासाठी आवश्यक ते सर्व चटईक्षेत्र वापरुन तिथे पाचशे रुग्णशय्या असलेले स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम करण्याची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले होते, त्यानुसार म्हाडाकडे त्याबाबत आवश्यक त्या अधिमूल्याचा भरणा केला असून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. येत्या महिन्याभरात संबंधित कामाची निविदा काढण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य सुनील राऊत यांनी कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथील क्रांतीवीर महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री उदय सामंत बोलत होते.
मंत्री श्री.सामंत म्हणाले की, महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या वास्तुविशारद सल्लागाराने सादर केलेल्या आराखड्यास म्हाडा प्राधिकरणाची मंजुरी, तसेच वृक्ष प्राधिकरण, पर्यावरण व वन मंत्रालय यांची ना-हरकत मिळण्यासह प्रस्तावित रुग्णालय आणि कर्मचारी सेवा निवासस्थानाच्या बांधकामासाठी निविदा मागविण्याकरिता प्रशासकीय मान्यता प्राप्त करण्याची कार्यवाही महानगरपालिका स्तरावर सुरु असून येत्या महिन्याभरात या बाबतची निविदा काढण्याची प्रक्रिया करण्यात येईल. त्याचप्रमाणे येत्या तीन वर्षांत रुग्णालयाचे काम पूर्ण केले जाईल, असे श्री.सामंत यांनी सांगितले.