Wednesday, December 2 2020 5:48 am

कंटेनर उलटल्याने पीक अवर्सला घोडबंदर रोड ‘चक्काजाम’

ठाणे, दि. २२ (प्रतिनिधी): प्लास्टिकच्या ट्यूबमध्ये असलेल्या ऑईलचा कंटेनर घोडबंदर रोडवरील पातलीपाडा उड्डाणपुलाच्या सुरवातीला उलटला. त्यामुळे ट्यूबमध्ये असलेले ऑईल उड्डाणपुलासह खालील रस्त्यावर पसरले. यावेळी चितळसर – मानपाडा पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस, अग्निशमन दल, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष, आयआरबीच्या  अधिकारी – कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र ऑईलचा थर हटवण्यासाठी आवश्यक असलेली माती गोळा करण्यात या सर्वच यंत्रणांचा कस लागला. अखेर दोन डंपर माती मुंब्रा, घोडबंदर रोड परिसरातून जमा करण्यात आले. जेसीबीच्या सहाय्याने अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी ही माती पसरवून सकाळी नऊपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
* सोशल मीडियावर पोलिसांचे कौतुक
पोलिसांच्या अधिकृत फेसबुक व ट्विटर हॅन्डलवर वाहतूक पोलिसांनी कोंडी होऊ नये, म्हणून केलेल्या पर्यायी व्यवस्थेचे नेटिझन्सनी कौतुक केले. घोडबंदरकडे जाणारी वाहतूक ब्रह्मांडकडून तर ठाण्याकडे येणारी वाहने विजय गार्डनमार्गे वाहतूक पोलिसांनी वळवल्याचे वाहतूक शाखेच्या कासारवडवली विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कर्डीले यांनी सांगितले.